Kolhapur: इचलकरंजीतील नूतन बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई; ठेवीदारांत खळबळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:19 PM2023-12-06T12:19:56+5:302023-12-06T12:20:13+5:30

इचलकरंजी : शहरातील सर्वसामान्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला. ...

License of Shankarao Pujari New Urban Co-operative Bank of Ichalkaranji in Kolhapur district cancelled, Reserve Bank action | Kolhapur: इचलकरंजीतील नूतन बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई; ठेवीदारांत खळबळ  

Kolhapur: इचलकरंजीतील नूतन बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई; ठेवीदारांत खळबळ  

इचलकरंजी : शहरातील सर्वसामान्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला. बँकेत भांडवलीची कमतरता असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ठेवीदार व ग्राहकांत खळबळ उडाली आहे.

शंकरराव पुजारी यांनी सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने या बँकेची स्थापना केली होती. त्यामुळे या बँकेला त्यांचे नावही देण्यात आले होते. २०२० पासून आर्थिक संकटामुळे बँकेची परिस्थिती खालावली. त्यानंतर ठेवीदारांनीही ठेवी काढण्यासाठी बँकेत गर्दी केली. १३ मे २०२२ पासून बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले. तेव्हापासून व्यवसाय बंद झाला. त्यातूनही बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांनी या अडचणीतून बँक नक्कीच मार्ग काढेल आणि पुन्हा नव्या जोमाने कार्यरत राहील, असे आश्वासन दिले होते. 

परंतु रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईमुळे सर्व काही ठप्प झाले. परंतु दिलासादायक बाब म्हणजे बँकेतील साधारण ९९.८४ टक्के ठेवीदार डीआयसीजी विमा योजनेंतर्गत समाविष्ट आहेत. त्यामुळे डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विमा योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा विमा उतरविला गेला आहे.

आरबीआयने ४ डिसेंबर २०२३ ला केलेल्या कारवाईत सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये बँकेत भांडवलीची कमतरता आहे. त्यामुळे बँकिंग सेवा देण्यासाठी भांडवल नाही. तसेच भविष्यात कमाईच्या साधनांबाबत कोणतीही ठोस योजना मांडण्यात बँक अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत आरबीआयच्या नियमांचे पालन होऊ शकत नाही, असा ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे बँकेचे सर्व व्यवहार बंद झाले आहेत.

इचलकरंजी शहरातील दहावी बँक

शहरातील कामगार, पीपल्स, महिला, साधना, शिवनेरी, इचलकरंजी अर्बन, शिवम, लक्ष्मी-विष्णू, चौंडेश्वरी या दहा सहकारी बँका आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे अडचणीत आल्या, या बँकेवरही सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. मात्र, कालांतराने या बँका अवसायनात निघाल्या. आता नूतन बँकेचाही त्यामध्ये समावेश झाला.

अध्यक्षांसह १९ जणांवर झाली आहे कारवाई

पदाचा दुरुपयोग करत व नियमबाह्य कर्जाचे वाटप करत आर्थिक बँकेला आर्थिक हानी पोहोचविल्या प्रकरणी १७ ऑगस्ट २०२३ ला बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्यासह पत्नी कांचन पुजारी, शाखाधिकारी मलकारी लवटे, कर्ज प्रमुख राजेंद्र जाधव यांच्यासह १९ जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर संगनमताने तीन कोटी ५८ लाख ३७ हजारांचा अपहार व गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Web Title: License of Shankarao Pujari New Urban Co-operative Bank of Ichalkaranji in Kolhapur district cancelled, Reserve Bank action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.