पानसरे यांच्या खूनाच्या तपासात गंभीरपणे लक्ष घालू : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 15:58 IST2020-02-19T15:56:48+5:302020-02-19T15:58:09+5:30
कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासात गंभीरपणे लक्ष घालण्याचे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले.

पानसरे यांच्या खूनाच्या तपासात गंभीरपणे लक्ष घालू : सतेज पाटील
कोल्हापूर : कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासात गंभीरपणे लक्ष घालण्याचे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले.
पानसरे यांच्या खुनास पाच वर्षे उलटली तरी तपास समाधानकारक झालेला नाही. गुन्हेगार फरार आहेत. गुन्ह्याचे वाहन व शस्त्रे यांचा शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर श्रमिक प्रतिष्ठान आणि आयटक कामगार संघटनेच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी पालकमंत्री आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली.
मेघा पानसरे यांनी त्यांना तपासाच्या सद्य स्थिती बाबत माहिती दिली, तसेच या खून प्रकरणाच्या तपासाचा संपूर्ण आढावा घेण्याची विनंती केली. तपासात काय अडचणी आहेत, तो अद्याप पूर्ण का झालेला नाही याबाबत नव्या महाविकास आघाडी सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सतेज पाटील यांनी यावेळी तपासाबाबत नवे सरकार गंभीर असून विधानसभा अधिवेशनादरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर एक बैठक आयोजित करण्यात येईल व त्यास आमंत्रित करण्यात येईल, असे सांगितले. त्यापूर्वी तपास अधिकारी व वकिलांशी चर्चा करून सखोल माहिती घेऊ, असे आश्वासन दिले.
पानसरे यांच्या खुनाचा तपास होऊन सर्व गुन्हेगार व सूत्रधार यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी दिलीप पवार, मेघा पानसरे, एस.बी. पाटील, आनंद परुळेकर, आय. बी. मुनशी, मल्हार पानसरे उपस्थित होते.