Kolhapur- शियेत बिबटयाने केली रेडकाची शिकार, पंधरा दिवसात चौथी घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 13:54 IST2023-04-20T13:52:56+5:302023-04-20T13:54:39+5:30
एखादी मनुष्य जीवितहानी झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का?

Kolhapur- शियेत बिबटयाने केली रेडकाची शिकार, पंधरा दिवसात चौथी घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
हरी बुवा
शिये : शिये (ता. करवीर) येथे बिबट्याने हल्ला करून रेडकू फस्त केले. महिन्यातील ही चौथी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एखादी मनुष्य जीवितहानी झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.
येथील शिवचा मळ्यात अनिल पाटील यांचा म्हशीचा गोठा आहे. काल, बुधवारी (दि.१९) रात्री येथील रेडकावर बिबट्याने हल्ला करून रेडकू फस्त केले. मागील आठवड्यात के.बी.खुटाळे व महादेव माने, संजय मगदूम यांच्या जनावरांच्या गोठ्यातील वासरू बिबट्याने ठार केले होते. गेल्या पंधरा दिवसात बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यापूर्वी बिबट्याने हल्ला केलेल्या ठिकाणी वन विभागाच्यावतीने कॅमेरे लावण्यात आले होते. पण त्यात काही ठोस निष्पन्न झाले नाही. घटनास्थळी वनरक्षक कृष्णात दळवी पंचनामा करण्यासाठी आले असता वन विभागाकडून बिबट्या पकडण्यासाठी आतापर्यंत सापळा का लावला नाही असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
पंधरा दिवसात ही चौथी घटना असूनही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले नाहीत. एखादी मनुष्य जीवितहानी झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येणार का असा सवाल करत मानवी वस्तीतील वन्यजीव कायदा रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड. माणिक शिंदे यांनी केली.