Leopard in Kolhapur: खाऊ पिऊ घालून बिबट्याला सोडले नैसर्गिक अधिवासात-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:21 IST2025-11-13T12:21:27+5:302025-11-13T12:21:58+5:30
भरकटल्याने, भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्या शहरात

Leopard in Kolhapur: खाऊ पिऊ घालून बिबट्याला सोडले नैसर्गिक अधिवासात-video
कोल्हापूर : गजबजलेल्या ताराबाई पार्कात पकडलेल्या ‘त्या’ बिबट्याला बुधवारी सायंकाळी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो तंदुरुस्त असल्याची खात्री करण्यात आली. नंतर खाऊ पिऊ घालून त्याला अंधार पडण्यापूर्वी नैसर्गिक अधिवासात सोडले असल्याची माहिती कोल्हापूरवनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.
मंगळवारी सकाळी ताराबाई पार्कमधील नागरी आणि मध्य वस्तीत बिबट्या शिरल्यानंतर तीन तासांचा थरार परिसरातील नागरिकांनी अनुभवला. या बिबट्याने सर्वांना चांगलाच घाम फोडला होता. भीती आणि धास्तीने नागरिकांचा थरकाप उडाला होता. नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची मानून याची दखल घेऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे सदस्य, मनपाचे अग्निशमन दलाचे कर्मचारी, वाहतूक पोलिस आणि शाहूपुरी पोलिस, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.
वाचा : बिबट्याच्या हल्ल्यातील गंभीर जखमींना ५ लाखांची भरपाई
बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने जाळी आणि पिंजरे लावले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. त्यानंतर त्या बिबट्याला करवीर तालुक्यातील चिखली येथील वन विभागाच्या उपचार केंद्रात आणण्यात आले. शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याच्या अंगावर कुठेही जखमा नाहीत, त्याचे पंजे चांगले आहेत तसेच त्याचा रक्तदाबही सामान्य आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याला खाऊ पिऊ घालून अखेर अंधार पडण्यापूर्वी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
भरकटल्याने, भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्या शहरात
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी आणि कोयना तर शेजारी चांदोली आणि सागरेश्वर ही दोन अभयारण्ये आहेत. या ठिकाणाहून भरकटल्याने अथवा भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्या शहरात आला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. चांदोली लगतच्या शिराळा, मणदूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यात काही ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. जेथून आला असा अंदाज आहे अशा परिसरातील नैसर्गिक अधिवासात या बिबट्याला सोडण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही माहिती देण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेज शोध सुरू
हा बिबट्या रविवारपासून शहरात फिरत असल्याचे वन विभागाने सांगितले. पहाटेच्या सुमारास जंगलातून भरकटल्याने अथवा भक्ष्याच्या शोधासाठी नागरी वस्तीत घुसला असावा, असा अंदाज आहे. त्याचे अस्तित्व नेमके कुठे होते अथवा तो कुठून आला ? याचा निश्चित अंदाज येण्यासाठी वन विभागाने या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात येत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.