चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:48 IST2025-12-21T16:46:53+5:302025-12-21T16:48:14+5:30
गेल्या अडीच वर्षांपासून काही शेतकरी आणि ग्रामपंचायत यांच्यात पाणंद रस्त्याच्या हद्दीवरून वाद सुरू होता. या प्रकरणी ग्रामपंचायतीकडून तहसीलदार व प्रांताधिकारी राधानगरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.

चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
कसबा वाळवे : चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील वादग्रस्त पाणंद रस्त्यालगत शनिवारी लिंबू व काळी बाहुली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पाणंद रस्ता खुला करण्याच्या प्रशासनाच्या स्पष्ट आदेशानंतर अंधश्रद्धेतून हा प्रकार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यामुळे गावात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून काही शेतकरी आणि ग्रामपंचायत यांच्यात पाणंद रस्त्याच्या हद्दीवरून वाद सुरू होता. या प्रकरणी ग्रामपंचायतीकडून तहसीलदार व प्रांताधिकारी राधानगरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. प्रत्यक्ष पाहणीअंती तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल देत वादग्रस्त पाणंद रस्ता तातडीने खुला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दि. २९ डिसेंबर रोजी रस्त्याचे काम सुरू होणार होते.
मात्र, काम सुरू होण्याच्या आधीच रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या संजय खोत यांच्या शेतबांधावरील झुडपात लिंबू व काळी बाहुली बांधलेली आढळून आली. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात अंधश्रद्धेच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे गावात गैरसमज, भीती आणि तणावाचे वातावरण पसरले असून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे.
जयवंत खोत
अध्यक्ष, तंटामुक्त समिती