उमेदवार शोधण्यासाठी नेत्यांचीच पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:28+5:302021-01-08T05:16:28+5:30
अमर पाटील कळंबा : एकीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक देव पाण्यात बुडवून बसले असले तरी प्रभाग ८० कणेरकर नगरमध्ये मात्र ...

उमेदवार शोधण्यासाठी नेत्यांचीच पळापळ
अमर पाटील
कळंबा : एकीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक देव पाण्यात बुडवून बसले असले तरी प्रभाग ८० कणेरकर नगरमध्ये मात्र उमेदवार शोधण्यासाठी सर्वच पक्षांची धावपळ सुरु आहे. प्रभाग ८० कणेरकरनगर हा इतर मागासवर्गीय पुरुष उमेदवारासाठी आरक्षित झाल्याने गेल्या वर्षभरापासून प्रभागात तयारी करणाऱ्यांची निराशा झाली आहे. या प्रभागात सक्षम उमेदवार देण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शोधमोहीम सुरु केली असल्याचे चित्र आहे. २०१५च्या निवडणुकीत जुन्या सानेगुरुजी वसाहत व बोन्द्रेनगर प्रभागातील ठराविक भागांचे एकत्रिकरण करून प्रभाग ८० कणेरकरनगर निर्माण करण्यात आला. गत निवडणुकीत हा प्रभाग अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित होता. त्यावेळी आठ महिला उमेदवार रिंगणात होत्या. यात काँग्रेसच्या वनिता देठे व भाजपच्या नूतन सरनाईक यांच्यात थेट लढत होऊन काँग्रेसच्या वनिता देठे मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. त्यामुळे यावेळीही या प्रभागात काँग्रेस-भाजप-ताराराणी आघाडी यांच्यातच थेट सामना होण्याची शक्यता आहे. गतवेळी शिवसेनेच्या अश्विनी माळगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदिनी बिद्रे यांना अपेक्षित मते घेता आली नसली, तरी हे दोन्ही पक्ष यावेळी या प्रभागात एकास एक उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. कुलदीप सावरतकर, माजी नगरसेवक अमोल माने, शैलेश भालकर, प्रकाश कारंजकर, समीर वरने, विकास पांगे यांची नावे चर्चेत आहेत.
प्रभागातील समस्या
१)सांडपाणी निर्गतीकरण करणारी गटारे विकसित नाहीत
२)रस्त्यावरची भाजी मंडई
३)स्टॉर्म वॉटर प्रकल्पाअभावी नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी
४)कमी दाबाने होणारा अपुरा पाणीपुरवठा
५)वाढत्या गुन्हेगारीने नागरिक हैराण
६)मुख्य रस्त्यांसह कॉलनी अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा
७)२७ खुल्या आरक्षित जागा तरीही क्रीडांगण, वाचनालय, विरंगुळा केंद्र, ओपन जीम, सांस्कृतिक सभागृहाची वानवा
सोडवलेले प्रश्न
१)प्रभागात ड्रेनेज लाईनचा बहुतांश प्रश्न मार्गी
२)प्रभागात महानगरपालिकेची शाळा सुरू केली
३)पाच खुल्या आरक्षित जागी ओपन जीम, विरंगुळा केंद्र विकसित केले
४)रस्ते, गटारे, पाणी प्रश्न बहुतांश मार्गी
५)संपूर्ण प्रभागात पथदिवे बसवले
६)स्वखर्चाने ज्येष्ठ नागरिकांना बैठकीसाठी ७५ लोखंडी बाकडी बसवली
प्रतिक्रिया नगरसेविका वनिता देठे
गेल्या पाच वर्षांत ३ कोटी७५ लाखांची विकासकामे प्रभागात केली आहेत. ड्रेनेज कामासाठी खोदलेले रस्ते विकसित करणे प्रलंबित आहेत. शिक्षण सभापती असताना शैक्षणिक प्रश्न मार्गी लावले. पालिकेच्या तोकड्या विकासनिधीमुळे विकासकामे करताना प्रचंड मर्यादा येतात. त्यामुळे नागरिकांचा मोठा रोष पत्करावा लागतो तरीही त्यावर मात करून रस्ते, गटारे, पाणी, कचरा उठाव आदी मूलभूत प्रश्न मार्गी लावले.
प्रभाग ८० कणेरकरनगर
विद्यमान नगरसेविका वनिता देठे
आताचे आरक्षण इतर मागासवर्गीय पुरुष
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
१) वनिता देठे (काँग्रेस) १२२९
२) नूतन सरनाईक (भाजप) ६२७
३) अश्विनी माळवी (शिवसेना) १०३
४)नंदिनी बिद्रे (राष्ट्रवादी काँग्रेस) १९६
फोटो ०४ प्रभाग क्रमांक ८०
ओळ
प्रभागातील मुख्य समस्या अविकसित रस्ते, जलवाहिनीची गळती, कसेही वाहणारे सांडपाणी