Kolhapur: जवान विजय कराडे यांना अखेरचा निरोप, पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना अपघात झाले होते गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:30 IST2025-09-10T13:30:12+5:302025-09-10T13:30:54+5:30
केवळ आठ महिनेच राहिला होता सेवा कालावधी

Kolhapur: जवान विजय कराडे यांना अखेरचा निरोप, पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना अपघात झाले होते गंभीर जखमी
दिंडनेर्ली : ‘अमर रहे अमर रहे, विजय कराडे अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये नागाव (ता. करवीर) येथील जवान विजय विलास कराडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.
पंजाबमधील चंदी मंदिर येथील रेजिमेंट येथे शनिवारी कर्तव्य बजावत असताना अपघात होऊन कराडे गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला होता. पुण्याहून मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव गावी आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी पार्थिव घरी आणताच आई-वडील, भाऊ, आजी-आजोबा आणि नातेवाइकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
गावातील सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूने रांगोळी काढून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून टाळ-मृदंगाच्या गजरात गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेदरम्यान उपस्थित सर्वांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून पुष्पवृष्टी केली. विजय ज्या शाळेत शिकले, ज्या मैदानावर भरतीचा सराव केला त्याच मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भाऊ अजयने पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी लष्कराच्या 109 मराठा बटालियनच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
अंत्ययात्रेत आमदार अमल महाडिक, आमदार सतेज पाटील, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे, करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, नायब तहसीलदार भालचंद्र यादव, सहायक पोलिस निरीक्षक मुदस्सर शेख, सरपंच सतपाल मगदूम, माजी सरपंच दीपाली विजय नाईक, रंगराव तोरस्कर, सुभेदार डाफळे, करिअर अकॅडमीचे प्रशिक्षक व विद्यार्थी, पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक उपस्थित होते. ग्रामपंचायत, तरुण मंडळे यांनी अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नेटके नियोजन केले होते.
केवळ आठ महिनेच राहिला होता सेवा कालावधी
विजय हे अग्निवीरमधून भरती झाले होते. आठ महिन्यांनंतर त्यांचा सेवा कालावधी संपणार होता. त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.