म्हाताऱ्या पावसाची भीती, माळ्यावर ठेवल्यात बाप्पांच्या मूर्ती; कोल्हापुरातील कुंभारवाड्यांमधील चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:08 IST2025-07-09T17:07:15+5:302025-07-09T17:08:21+5:30
महापूर आल्यास दरवाढीची धास्ती

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : आता तरणा पाऊस पडतोय.. असा असला तर काय वाटत न्हाई ओ, म्हातारा सुरू झाला की काय खरं नाही, ओढ्याच्या काठाला घरं असल्याने महापुराचे पाणी आधी घरात शिरतंय. पार दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी टेकतंय.. अशा वेळी बाप्पाच्या मूर्ती हलवायला लागतात. म्हणून आता आत्ता नुसतंच मूर्ती बनवून माळ्यावर ठेवत आहे. एवढा महिना सरला की जोमाने काम सुरू करणार.. वर्षानुवर्षे मूर्ती बनवत असेलल्या शाहुपुरी कुंभारवाड्यातील महिला महापुराच्या धास्तीचे अनुभव मंगळवारी मांडत होत्या.
या वर्षी सगळे सण लवकर येत आहेत. गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. सणाला आता दीड पावणे दोन महिने राहिल्याने शहरातील बापट कॅम्प, शाहुपुरी, गंगावेश या प्रमुख तीन कुंभारवाड्यांमध्ये मूर्ती बनविण्याला सुरुवात झाली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात घरगुती मूर्ती बनवल्या जात आहेत.
एवढा महिना धास्तीचा
शाहुपुरी कुंभार गल्ली आणि बापट कॅम्प कुंभार गल्लीला महापुराचा धोका आहे. २०१९ आणि २०२१ साली आलेल्या पुरात येथील बाप्पाच्या मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कुंभार बांधव जणू ऑक्सिजनवरच आहेत.
मूर्ती हलवल्या..
धरणं भरत आल्याने कुंभारांनी तयार गणेशमूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरू केले आहे. आयर्विन ख्रिश्चन शाळेला लागून असलेले शेड आणि मार्केट यार्ड, पाणी येत नाही, तेथील गोडावून या ठिकाणी मूर्ती हलवल्या जात आहेत. मोठ्या गणेशमूर्ती अजून मार्केट यार्डमध्ये आहेत. पुराची शक्यता कमी झाली. पाऊस ओसरला की, या मूर्ती शहरात आणल्या जातील.
- शहरातील कुंभार बांधव : ३ हजार
- कोल्हापुरात आवश्यक गणेशमूर्तींची संख्या : दीड ते दाेन लाख
रंगकाम करून तयार असलेल्या गणेशमूर्ती जिथे पाणी येत नाही, त्या दुसऱ्या मजल्याच्या माळावर ठेवल्या आहेत. पावसाचं काही खरं नाही. त्यामुळे आत्ता नुसत्या कच्च्या मूर्ती बनवत आहे. एवढा महिना गेला की पुढचं काम सुरू करणार. - योगिता पुरेकर, कुंभार गल्ली कोल्हापूर.
मागच्या वेळी दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आले होते. म्हातारा पाऊस पडून गेल्याशिवाय काय खरं नाही. गणेशमूर्ती हलवाहलवीत वेळ, श्रम, पैसा खर्च होतो. पूर आला, तर गणेशमूर्ती कमी पडतात, त्यामुळे थोडी दरवाढ होते. या वर्षीही पुराची भीती आहेच. त्यामुळे जपूनच मूर्ती बनवत आहोत. - दीपक कुंभार, कुंभार गल्ली कोल्हापूर.