इतर जिल्ह्यांतील रुग्णांमुळे वाढला कोल्हापूरचा मृत्युदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:23 IST2021-04-25T04:23:29+5:302021-04-25T04:23:29+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहर हे वैद्यकीयदृष्ट्या विकसित झाल्याने कोरोनाचे अनेक जिल्ह्यांतील रुग्ण येथे ...

इतर जिल्ह्यांतील रुग्णांमुळे वाढला कोल्हापूरचा मृत्युदर
कोल्हापूर : कोल्हापूर शहर हे वैद्यकीयदृष्ट्या विकसित झाल्याने कोरोनाचे अनेक जिल्ह्यांतील रुग्ण येथे उपचारांसाठी येत आहेत. त्यामुळे मृत्यू पावणाऱ्या कोरोना रुग्णांमध्येही इतर जिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २३ दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात २३६ मृत्यू झाले. त्यातील ४९ जण (सरासरी २१ टक्के) हे अन्य जिल्ह्यांतील आहेत. अन्य जिल्ह्यांतील रुग्णांच्या मृत्यूमुळे कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्युदरही वाढत असल्याचे चित्र आहे. कोल्हापूरचा मृत्युदर ३.२ असून, तो राज्य व देशाच्या मृत्युदराच्या दुप्पट आहे. त्यामुळे हा दर एवढा जास्त का आहे याचा शोध ‘लोकमत’ने घेतला.
गेल्यावर्षी कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून सुरुवातीला परिस्थिती नियंत्रणामध्ये होती; परंतु जूननंतर कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. सप्टेंबरमध्ये तर उच्चांकी रुग्णसंख्या नोंदली गेली. आक्टोंबरनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले. ऑगस्टमध्येही मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. २०२० मध्ये सर्वाधिक एका दिवसात ३३ मृतांची संख्या ऑगस्टमध्ये नोंदविण्यात आली होती.
मात्र, १९ एप्रिल २०२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे ३४ ही मृतांची संख्या नोंदविण्यात आली. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मृतांची संख्या तुलनेत नियंत्रणामध्ये होती. एप्रिलच्या १५ तारखेपर्यंतही ती अतिशय कमी होती. मात्र, १६ एप्रिलनंतर ही संख्या वाढत गेल्याचे दिसून येते. या आकडेवारीचा विचार करता अन्य जिल्ह्यांतील मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्याही दखल घेण्याजोगी आहे. २३६ पैकी तब्बल ४९ रुग्ण हे अन्य जिल्ह्यांतील आहेत. जे उपचारांसाठी कोल्हापुरात दाखल झाले होते.
चौकट -
जानेवारीपासूनचे मृत्यू
जानेवारी २०२१ : ११
फेब्रुवारी २०२१ : २२
मार्च २०२१ : २७
२३ एप्रिलपर्यंत : २३६
एकूण २९६
चौकट
सांगलीपासून सिंधुदुर्गपर्यंतचे रुग्ण
एकतर कोल्हापूर हे वैद्यकीयदृष्ट्या पुढारलेले शहर आहे. सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, निपाणी यांचा केंद्रबिंदू मानले जाते. या शहरातील अनेकजण नोकरी, व्यवसायानिमित्त कोल्हापुरात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे आपले आई, वडील, नातेवाईक यांना उपचारांसाठी कोल्हापुरात आणले जाते. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संख्येतही अन्य जिल्ह्यांतून आलेल्या रुग्णांची मोठी संख्या आहे. केवळ २३ दिवसांमध्ये अन्य जिल्ह्यांतील ४९ रुग्णांचा समावेश असून, यामध्ये सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या जास्त आहे.
कोट
कोल्हापूर जिल्ह्यातील मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना व्हायरस हा मल्टिस्टेन आहे. त्याचे स्वरूप तीव्र आहे. अशातच आजार अंगावर काढला जातो. मुळातच ज्येष्ठ नागरिक हे व्याधीग्रस्त असतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे.
डॉ. योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकरी, कोल्हापूर जिल्हा परिषद
मृत्युदर वाढण्याची कारणे
१.कोरोनाला बळी पडण्यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त
२.उपचारासाठी वेळाने दाखल होणे
३.इतर जिल्ह्यांतील रुग्णांच्या मृत्यूची नोंद कोल्हापूरच्या यादीत
४.व्याधीग्रस्त लोकांची प्रतिकारशक्ती कमी