ओवीसाठी कोल्हापूरकरांनी दातृत्व दाखविले, एसएसपीई या दुर्मीळ आजाराने ग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:03 IST2025-04-05T12:02:59+5:302025-04-05T12:03:20+5:30
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील सागर पुजारी यांच्या ओवी या मुलीला एसएसपीई (सबएक्यूट स्क्लेरोसिंग पैनेंसेफलाइटिस) हा एक दुर्मीळ आणि गंभीर ...

ओवीसाठी कोल्हापूरकरांनी दातृत्व दाखविले, एसएसपीई या दुर्मीळ आजाराने ग्रस्त
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील सागर पुजारी यांच्या ओवी या मुलीला एसएसपीई (सबएक्यूट स्क्लेरोसिंग पैनेंसेफलाइटिस) हा एक दुर्मीळ आणि गंभीर स्वरूपाचा आजार झाला आहे. सात वर्षाच्या मुलीला या आजाराने जखडले असून तिच्यावर होणारे उपचारही खर्चिक आहेत. सागर पुजारी यांनी लेकीसाठी परदेशातून उपचारासाठी लागणारे इंजेक्शन आणले. ओवीवर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करताच कोल्हापूरच्या नागरिकांनी ओवीच्या उपचारासाठी अर्थसाहाय्य करण्यास सढळ हाताने सुरुवात केली आहे.
कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांनी पुजारी कुटुंबीयांसाठी धावून जात मदतीचा हात पुढे केला आहे. पुजारी कुटुंबीयांना सर्वच स्तरातून आर्थिक मदत केली जात आहे. विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांनी ओवीच्या आजाराची माहिती समजताच तिला पंचवीस हजार रुपयांची तत्काळ मदत जाहीर केली आहे.
ओवीच्या उपचारासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत असून पन्नास हजारहून अधिक मदत करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधीमार्फत एक लाख रुपयांचा निधीही ओवीच्या उपचारासाठी मंजूर झाला आहे. मुलीच्या दुर्मीळ आजाराच्या उपचारासाठी होणारा भरमसाट खर्च पाहता पुजारी कुटुंबीयांना कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा मोठा आधार मिळतो आहे.