कोल्हापूरचा ‘सिनेमॅन’ सातासमुद्रापार, स्पेनच्या चित्रपट महोत्सवात मिळाली तीन नामांकने
By संदीप आडनाईक | Updated: May 28, 2025 13:01 IST2025-05-28T13:01:08+5:302025-05-28T13:01:34+5:30
उत्कृष्ट चित्रपटासह किशोर कदम, ऋषिकेश कुलकर्णी यांचा समावेश

कोल्हापूरचा ‘सिनेमॅन’ सातासमुद्रापार, स्पेनच्या चित्रपट महोत्सवात मिळाली तीन नामांकने
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोल्हापुरातील युवा दिग्दर्शक उमेश बगाडे यांच्या ‘सिनेमॅन’ चित्रपटाला स्पेनच्या माद्रीद येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तीन नामांकने मिळाली आहेत. उत्कृष्ट चित्रपटासह अभिनेता किशोर कदम यांना उत्कृष्ट अभिनेता आणि ऋषिकेश कुलकर्णी यांना उत्कृष्ट संगीतासाठी नामांकन मिळालेले आहे.
कोल्हापुरातील युवा दिग्दर्शक उमेश बगाडे याने चिल्लर पार्टीचे संस्थापक मिलिंद यादव यांच्यावर आधारित ‘सिनेमॅन’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. चतुरस्त्र अभिनेता किशोर कदम यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, सिद्धार्थ बेदी, रिचर्ड केविन, रिकी वूड यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.
गतवर्षी कोलकाता येथील चित्रपट महोत्सवासाठी याची निवड झाली होती. आता १ ते १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत स्पेनच्या माद्रीद येथे होणाऱ्या इमॅजिन इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी उत्कृष्ट मानवतावादी चित्रपट म्हणून जीवनगौरव पुरस्कार, किशोर कदम यांना उत्कृष्ट अभिनेता, आणि ऋषिकेश कुलकर्णी यांना उत्कृष्ट संगीतासाठी नामांकन मिळालेले आहे.
लघुपटानंतर चित्रपटासाठी धाडस
टीव्ही, लघुपट आणि माहितीपटांचा ७ ते ८ वर्षांचा अनुभव असलेल्या बगाडे यांच्या ‘चौकट’ लघुपटाची २०१६ मध्ये भारतीय पॅनोरमासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली होती. त्यांच्या ‘अनाहुत’ या लघुपटाने २०१८ मध्ये फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रेक्षक पसंती पुरस्कार जिंकला. हे दोन्ही लघुपट प्रतिष्ठेच्या जागतिक महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाले आहेत. आता त्यांनी पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे.
या चित्रपटासाठी कोल्हापुरातील तंत्रज्ञांनी मेहनत घेतलेली आहे. या चित्रपटाचे बहुतांशी चित्रिकरण कोल्हापुरात तर उर्वरित चित्रिकरण लंडनमध्ये झाले आहे. आपल्या समृद्ध संस्कृतीपासून ते त्याच्या कलात्मक भावनेपर्यंत, कोल्हापूर हे नेहमीच सिनेमाचा श्वास घेणारे शहर आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कोल्हापूरचे नाव घेतले जात आहे, याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. -उमेश बगाडे, दिग्दर्शक, सिनेमॅन.