शैक्षणिक निर्देशांकात कोल्हापूर भारी, राज्यात पटकावला प्रथम क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:25 IST2025-07-01T13:24:26+5:302025-07-01T13:25:53+5:30
विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी २८ व्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूरने यंदा थेट पहिला क्रमांक मिळवला

शैक्षणिक निर्देशांकात कोल्हापूर भारी, राज्यात पटकावला प्रथम क्रमांक
कोल्हापूर : शैक्षणिक गुणवत्तेसह भौतिक सुविधांचा लेखाजोखा मांडणाऱ्या २०२३-२४ च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी २८ व्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूरने यंदा थेट पहिला क्रमांक मिळवत कोल्हापूरची शैक्षणिक गुणवत्ता भारीच असल्याचा प्रत्यय दिला आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून शैक्षणिक निर्देशांक निश्चित करण्यात येतो. यासाठी युडायस प्लस माहिती, राष्ट्रीय संपादणूक पातळी व इतर शैक्षणिक माहिती अशी ७२ दर्शकांसाठी एकूण ६०० गुणांचे गुणांकन केले जाते. याआधारे जिल्ह्याचे राज्यातील शैक्षणिक निर्देशकांमधील स्थान निश्चित होते.
कोल्हापूरने ६०० पैकी ३४५ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देवोल यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर व डाएटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई यांचा गौरव करण्यात आला.