Kolhapur: कारवरील स्टिकर पोलिस अधीक्षकांच्या नजरेत आले, थेट जप्तीचे आदेश दिले; असं नेमकं काय लिहिलं.. वाचा
By उद्धव गोडसे | Updated: August 28, 2025 14:04 IST2025-08-28T14:03:05+5:302025-08-28T14:04:45+5:30
हटके हौसेचे मोल चुकते करावे लागले

Kolhapur: कारवरील स्टिकर पोलिस अधीक्षकांच्या नजरेत आले, थेट जप्तीचे आदेश दिले; असं नेमकं काय लिहिलं.. वाचा
उद्धव गोडसे
कोल्हापूर : वाहनांवर काहीतरी भन्नाट ओळी लिहून लक्ष वेधून घेण्याचा किंवा संदेश देण्याचा प्रकार प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमांत बसत नाही. तरीही काही हटके मजकूर लिहिण्याची हौस वाहनधारकांमध्ये असते. कोल्हापुरातील एका कारमालकाला अशाच त्याच्या हटके हौसेचे मोल चुकते करावे लागले.
'सावधान!, हे मशीन आहे. या गाडीला मेंदू नाही. आपला मेंदू वापरा,' अशा ओळी लिहिलेले कारवरील स्टिकर पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या नजरेत आले आणि त्यांनी थेट कार जप्त करून कारवाई करण्याचा आदेश दिला. हा प्रकार बुधवारी (दि. २७) सकाळी घडला.
पोलिस अधीक्षक योगेश कुमार बुधवारी सकाळी बापट कॅम्प येथे निघाले होते. लिशा हॉटेल चौकात त्यांना एक कार दिसली. कारच्या मागील काचेवर एक स्टिकर होते. 'सावधान!, हे मशीन आहे. या गाडीला मेंदू नाही. आपला मेंदू वापरा,' अशा ओळी त्यावर लिहिल्या होत्या. तसेच मागच्या बाजूची नंबरप्लेट नव्हती. अधीक्षकांनी तातडीने संबंधित कार जप्त करून मालकावर कारवाई करण्याचा आदेश दिला.
त्यानुसार काही मिनिटांत शाहूपुरी पोलिस लिशा हॉटेल चौकात पोहोचले. त्यांनी संबंधित कार जप्त करून पोलिस ठाण्यात आणली. कारवरील स्टिकर आणि नंबरप्लेटबद्दल पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी कारच्या मालकाकडे चौकशी केली. दंडात्मक कारवाई करून त्याला सोडून दिले.
आधीच्या मालकामुळे अडकला
मुंबई पासिंग असलेली कार चार महिन्यांपूर्वीच कोल्हापुरातील तरुणाने खरेदी केली आहे. आधीच्या मालकाने ते स्टिकर लावले होते. गेल्याच आठवड्यात गाडी वळवताना मागील नंबरप्लेट तुटल्याचे सांगत त्याने कारमधील तुटलेली नंबरप्लेट पोलिसांना दाखवली. कार खरेदीची कागदपत्रे दाखवत आक्षेपार्ह स्टिकर काढण्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर त्याची पोलिस ठाण्यातून सुटका झाली.