Kolhapur Shining in 'Khelo India' | ‘खेलो इंडिया’त कोल्हापूर शायनिंग; राज्याच्या २५५ पदकांपैकी ३४ हून अधिक पदके कोल्हापूरकरांची
‘खेलो इंडिया’त कोल्हापूर शायनिंग; राज्याच्या २५५ पदकांपैकी ३४ हून अधिक पदके कोल्हापूरकरांची

ठळक मुद्दे१२ सुवर्ण, आठ रौप्य, १४ कांस्यचा समावेशनिवड झालेले ७९ सर्वाधिक खेळाडू; सुविधा नसतानाही केली कमाल

सचिन भोसले ।

कोल्हापूर : गुवाहाटी (आसाम) येथे झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी तब्बल ३४ पदकाची कमाई केली, यात १२ सुवर्ण, आठ रौप्य व १४ कांस्यपदकांचा समावेश आहे. देशात महाराष्ट्रानेमहाराष्ट्रात कोल्हापूरने डंका वाजवला आहे. कोल्हापूर म्हटलं की सारा देश कुस्तीची आठवण काढतो परंतु त्याशिवाय आता सर्वच खेळांमध्ये कोल्हापूरचे खेळाडू विजयी पताका लावत असल्याचे अभिमानास्पद चित्र या स्पर्धेतून पुढे आले आहे.

यश मिळविलेल्या अनेक मुलामुलींना सरावाची साधने कमी होती. पालकांचीही आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. अनेक मुला, मुलींची थेट वृत्तपत्रांत नावे आल्यानंतरच, ती प्रसिद्ध झाल्यानंतरच अनेकांना समजले की, ही मुले हे खेळ खेळतात. त्यामुळे त्यांचे यश अनमोल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. जिम्नॅस्टिक्स, कबड्डी, व्हॉलिबॉल, धनुर्विद्या, ज्यूदो, टेबलटेनिस, अ‍ॅथलेटिक्स, नेमबाजी, सायकलिंग, फुटबॉल, हॉकी, खो-खो, बास्केटबॉल, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, कुस्ती, जलतरण, टेनिस, बॅडमिंटन या खेळप्रकारांतही येथील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत देशात वाहवा मिळविली आहे.

जिल्ह्यातून ७९ खेळाडूंची वैयक्तिक व सांघिक संघांमधून निवड झाली होती. त्यात आजअखेर ३४ पदकांची कमाई केली. इंगळीच्या पूजा दानोळे हिने सायकलिंगसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना असामान्य कामगिरी करीत चार सुवर्णपदकांची कमाई केली. तिच्यासह बॉक्सिंगमध्ये १७ वर्षांखालील गटात ६३ किलोंमध्ये दिशा पाटील, तर इचलकरंजीच्या सूतगिरणी कामगाराची मुलगी असलेल्या श्रुती कांबळे हिनेही उंच उडीत सुवर्ण-पदकाची कमाई केली. सुवर्णपदक विजेत्या १७ वर्षांखालील सांघिक खो-खो मुलांच्या संघातही ऋषिकेश शिंदे, रोहन कोरे, विशाल कुसाळे, आदर्श मोहिते, तर मुलींमध्ये हर्षदा पाटील, श्रेया पाटील या कोल्हापूरच्या सहा खो-खोपटूंचा समावेश आहे. १७ वर्षांखालील ६३ किलोगटात वेटलिफ्टिंगमध्ये अनिरुद्ध निपाणे, तर ७३ किलोगटात अभिषेक निपाणे यांनी, तर मुलींमध्ये अनन्या पाटील हिने सुवर्णपदकाची कमाई केली. जलतरणमध्ये युगंधरा शिर्के हिने रिलेमध्ये सुवर्ण व वैयक्तिक कांस्यपदकाची कमाई केली.

राज्य संघाने २१ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. यात अक्षय पायमल, पवन माळी, संकेत साळोखे, ऋतुराज संकपाळ या कोल्हापूरच्या चार युवा फुटबॉलपटूंचा संघात समावेश होता.

रौप्यपदक पटकाविलेल्यांमध्ये २१ वर्षांखालील ज्यूदो स्पर्धेत ७३ किलोगटात निशांत गुरव, तर शिवाजी बागडे (बास्केटबॉल), श्रेया जनमुखी, रितेश म्हैशाळे, तेजस जोंधळे, आरती सातगुंटी (वेटलिफ्टिंग), नेहा चौगुले (कुस्ती), विवेक सावंत (कुस्ती). कांस्यपदक विजेत्यांमध्ये सुश्रुत कापसे १५०० मीटर धावणे, शाहू माने (नेमबाजी), आदिती बुगड (मैदानी स्पर्धा), अनिकेत माने (उंच उडी), विक्रांत (ज्यूदो), तितीक्षा पाटोळे (४ बाय ४०० रिले), रिया पाटील (४ बाय ४००) , अनुष्का भोसले, सुस्मिता पाटील (हॉकी), विकास खोडके (४ बाय ४०० रिले), अवधूत परुळेकर याने (जलतरण २०० मीटर बटरफ्लाय), प्रवीण पाटील, स्मिता पाटील, अतुल माने (कुस्ती) यांचा समावेश आहे. राज्य संघात यश मिळविलेल्यांमध्ये २७ जणांचा समावेश आहे.

 

राज्य सुवर्ण रौप्य कांस्य एकूण पदके
महाराष्ट्र ७८ ७६ १०१ २५५
हरियाणा २३ २५ २५ ७३
उत्तरप्रदेश १७ १३ १८ ४८
दिल्ली १७ १२ १९ ४८
केरळ १३ ०३ १२ २८
गुजराथ ११ १० १४ ३५
मध्यप्रदेश १० ०८ ०९ २७
तमिळनाडू ०९ १८ ११ ३८
मणिपूर ०९ ०८ ०८ २५
पश्चिम बंगाल ०७ ०९ ०६ २२

  • शालेय शिक्षकांमुळे घडली पूजा

इंगळी येथे राहणारी पूजा पट्टणकोडोली येथील अनंत विद्यामंदिरमध्ये शिकत होती. घर ते शाळा असा तीन किलोमीटरचा प्रवास ती रोज सायकलवरून करीत होती. हे पाहून तिच्या शिक्षकांनी सायकलचे वेड पाहून तिला सायकलिंग स्पर्धेसाठी तयार करू, असे वडील बबन दानोळे यांना सांगितले. एका स्पर्धेत ती सायकलवरून पडली. त्यानंतर बरोबर एक वर्षानतर तिने साध्या सायकलवरून जिल्हा, राज्य अशा स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आतापर्यंत एकूण १५ सुवर्णपदके पटकाविली आहेत. तिच्यातील चमक पाहून प्रथम बालेवाडी येथे तिला प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळाला. तेथील कामगिरी पाहून महाराष्ट्र सायकल फेडरेशनने तिची दिल्ली येथील ‘साई’मध्ये निवड करण्यासाठी शिफारस केली. त्यानुसार दिल्लीतील खेळ प्राधिकरण (साई) च्या प्रशिक्षण केंद्रात ती सध्या सायकलिंगचा सराव करीत आहे.

 

  • या स्पर्धेत २० क्रीडाप्रकारांचा समावेश होता. त्यात महाराष्ट्र संघाने १९ क्रीडाप्रकारांत भाग घेतला. जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे (ज्यूदो, व्यवस्थापक), व्हॉलिबॉलचे प्रशिक्षक अजित पाटील, तर धनुर्विद्याचे व्यवस्थापक म्हणून रघू पाटील, मैदानी स्पर्धेसाठी प्रशिक्षक, व्यवस्थापक सुभाष पवार व कुस्तीसाठी क्रीडाधिकारी प्रवीण कोंडवळे, नेमबाजीसाठी प्रशिक्षक अजित पाटील आणि मुख्य व्यवस्थापक म्हणून मूळचे कोपार्डेचे, पण सध्या पुणे येथील क्रीडा व युवा संचालनालयात क्रीडाधिकारी असलेले अरुण पाटील यांनी उत्तमपणे जबाबदारी सांभाळली.

 

  • राज्य संघाने २१ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. यात अक्षय पायमल, पवन माळी, संकेत साळोखे, ऋतुराज संकपाळ या कोल्हापूरच्या चार फुटबॉलपटूंचा संघात समावेश होता.

 

मला प्रथम आशियाई स्पर्धेचे विजेतेपद पटकावयाचे आहे. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेसाठी प्रयत्न करायचे आहेत. माझे अंतिम ध्येय आॅलिम्पिकमध्ये पदक पटकाविण्याचे आहे. याकरिता मी लागेल तितके कष्ट करण्यास तयार आहे. ‘खेलो इंडिया’त मला चार सुवर्णांसह एक रौप्यपदक मिळविता आले, ही बाब मला कोल्हापूरकर म्हणून अभिमानास्पद आहे.
- पूजा दानोळे, सायकलपटू

 

खेलो इंडियात पहिल्या वर्षी एक सुवर्णपदक कमी पडल्याने पहिला क्रमांक हुकला, तर दुसऱ्या वर्षी ही उणीव भरून काढत आम्ही पहिला क्रमांक पटकाविला. यंदाही हीच परंपरा कायम राखत तिसºया वर्षीही अग्रस्थान कायम राखले आहे. हे यश राज्यात रुजलेल्या क्रीडा परंपरेचे आहे.
- अरुण पाटील, मुख्य व्यवस्थापक व क्रीडाधिकारी, राज्य क्रीडा व युवा संचालनालय, पुणे

 

कोल्हापूरच्या मुलामुलींमध्ये सराव साधनांचा अभाव असला तरी त्यांची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. त्यांचे परिश्रम कामी आले. त्यामुळे आपण राज्याच्या एकूण पदकांच्या वाट्यामध्ये सरस ठरलो. शिक्षक, संघटना आणि पालकांचे योगदान यात मोलाचे ठरले.
- डॉ.चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी


 

Web Title: Kolhapur Shining in 'Khelo India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.