शेणींचा तुटवडा; कोल्हापूरकरांनो बदल स्वीकारा, अंत्यसंस्कारासाठी गॅस शवदाहिनीचा वापर करा
By भारत चव्हाण | Updated: November 15, 2025 18:37 IST2025-11-15T18:37:32+5:302025-11-15T18:37:50+5:30
एक कोटींची गॅसदाहिनी; अंत्यसंस्काराचे प्रमाण कमी

शेणींचा तुटवडा; कोल्हापूरकरांनो बदल स्वीकारा, अंत्यसंस्कारासाठी गॅस शवदाहिनीचा वापर करा
भारत चव्हाण
कोल्हापूर : पुरोगामी शहर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर शहरातील नागरिक नवे बदल स्वीकारतात, असा अनुभव आहे. या शहराने काही आदर्शही घालून दिले, त्याचा स्वीकार नंतर राज्यभरातून केला गेला. गेल्या काही वर्षांपासून येथील स्मशानभूमीत गॅसदाहिनी बसविली, पण त्याचा वापर करण्याची अजूनही मनाची तयारी कोल्हापूरकरांनी केलेली नाही. पारंपरिक लाकूड शेणीऐवजी गॅसदाहिनीत मृतदेह दहन करण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे.
महापालिकेतर्फे सामाजिक भावनेतून काेणाच्या घरी एखादी व्यक्ती मृत झाली तर त्या मृत व्यक्तींच्या पार्थिवावर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. एवढेच नाही तर मृत व्यक्तीच्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह नेण्यासाठी मोफत शववाहिकाही दिली जाते. त्यामुळे अनेकांचा वेळ वाचतो, नातेवाईक, कुटुंबीय यांचा त्रास कमी होतो. या सामाजिक उपक्रमाचे राज्यभरातून स्वागत करण्यात आले.
महापालिकेमार्फत प्रत्येक वर्षी अंत्यसंस्कारासाठी शेणी, लाकडे खरेदी केली जातात. परंतु अलीकडील काळात पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी म्हणून वृक्षतोड कमी झाली आहे. लाकडं बाजारात सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. शेणी मिळण्यातही अडचणी येतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने बदल स्वीकारला.
लाकडं, शेणी मिळण्यात येत असलेल्या अडचणी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने प्रशासनाने स्मशानभूमीकरिता एक गॅसवर चालणारी शवदाहिनी बसविली. २०१६-१७ मध्ये बडोदा येथे राहणाऱ्या तसेच मूळचे कोल्हापूरचे असलेले व्यावसायिक राजेंद्र चव्हाण यांनी येथील स्मशानभूमीची ख्याती ऐकून गॅसदाहिनी मोफत दिली होती. या गॅसदाहिनीचा कोरोना काळात मोठा उपयोग झाला होता. कोरोनाने मृत झालेल्या अनेकांच्या पार्थिवावर गॅसदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
पारंपरिक पद्धतीलाच प्राधान्य
ही गॅसदाहिनी जीर्ण तसेच नादुरुस्त झाल्याने पालिका प्रशासनाने तब्बल एक कोटी रुपये खर्च करून नवीन गॅसदाहिनी बसविली आहे. ती विजेवर चालेल, अशीही व्यवस्था त्यात आहे. परंतु या दाहिनीवर म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांकडून लाकूड, शेणी या पारंपरिक पद्धतीलाच प्राधान्य दिले आहे.
केवळ ७३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
फेब्रुवारीला बसविण्यात आलेल्या या गॅसदाहिनीवर आतापर्यंत नऊ महिन्यांत केवळ ७३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर त्याच ठिकाणी लाकूड व शेणीच्या माध्यमातून रोज १२ ते १५ मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात.
प्रबोधनाची चळवळ सुरू व्हायला पाहिजे
‘मेलेल्याला आगीची काय भीती’ असा एक वाक्प्रचार आहे. या वाक्प्रचाराची जाणीव करून देण्याची तसेच प्रबोधन करण्याची गरज आहे. मृतदेह लाकडं शेणीत जाळला काय आणि शवदाहिनीत जाळला काय? काहीच फरक नाही. फक्त नातेवाईक, मित्र मंडळींनी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.