वाघनखे प्रदर्शन उद्घाटनाकडे लोकप्रतिधींसह कोल्हापूरकरांनी फिरवली पाठ -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:56 IST2025-10-28T17:54:17+5:302025-10-28T17:56:01+5:30
राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या सोहळ्यासाठी खुर्च्या रिकाम्याच पडल्याने एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावून आणून बसवण्यात आले

वाघनखे प्रदर्शन उद्घाटनाकडे लोकप्रतिधींसह कोल्हापूरकरांनी फिरवली पाठ -video
कोल्हापूर : लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून आणलेल्या वाघनखे प्रदर्शन सोहळ्याच्या उद्घाटनाकडे लोकप्रतिनिधींसह कोल्हापूरकरांनी पाठ फिरवली. राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या सोहळ्यासाठी खुर्च्या रिकाम्याच पडल्याने एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावून आणून बसवण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनासाठी महिनाभर थांबवलेले हे प्रदर्शनाचे अखेर आज, मंगळवारी (दि.२८) मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे पुढील ८ महिने ही वाघनखे नागरिकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहेत.
प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता होणार होते. मात्र हा कार्यक्रम सकाळी १० वाजताच सुरू झाला. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी ऑनलाईन या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. केवळ पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकीएन एस या कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी या सोहळ्यासाठी उपस्थित नव्हते.
हा केवळ औपचारिक कार्यक्रम आहे. येत्या आठ महिन्यात विविध कार्यक्रमांचा आयोजन केले जाणार आहे. पण कार्यक्रमात ढिसाळ आणि निष्काळजीपणा झाला असेल तर अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.