कोल्हापूरकर फिरणार १३१ देशात; गेल्या पाच वर्षांत किती जणांनी काढले आंतरराष्ट्रीय वाहन परवाने... वाचा
By सचिन यादव | Updated: November 14, 2025 18:03 IST2025-11-14T18:01:36+5:302025-11-14T18:03:42+5:30
भारताबाहेर प्रवास करताना, एखाद्याला स्वत : वाहन चालवून रोड ट्रिपचा आनंद घ्यायचा असतो. परंतु भारतीय परवाना फक्त भारतातच वैध असतो

संग्रहित छाया
सचिन यादव
कोल्हापूर : नोकरीनिमित्त अनेक कोल्हापूरकर विदेशात आहेत. तेथे काहीजण वाहन चालविण्यासाठी इच्छुक असतात. या हौसेपोटी कोल्हापूरकरांनी गेल्या पाच वर्षांत १,६२३ आंतरराष्ट्रीय वाहन परवाने काढले आहेत. या आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याच्या आधारे १३१ देशांत वाहन चालविता येऊ शकते.
भारताबाहेर प्रवास करताना, एखाद्याला स्वत : वाहन चालवून रोड ट्रिपचा आनंद घ्यायचा असतो. परंतु भारतीय परवाना फक्त भारतातच वैध असतो. देशाबाहेर वाहन चालवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज असते. हा परवाना मोटारचालकांना त्यांनी प्रवास केलेल्या देशात कायदेशीररीत्या परवानाधारकचालक म्हणून ओळखले जातात.
आंतरराष्ट्रीय परवाना काढण्यासाठी अटी
- वाहनपरवाना बंधनकारक
- भारतीय नागरिकत्व
- अर्ज क्रमांक ए भरावा लागेल
- देशाचे नाव, किती दिवसांचा प्रवास
एक वर्षासाठी परवाना वैध
आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची वैधता १ वर्षाची असते. त्यानंतर या परवान्याची मुदत संपते. हा परवाना परत नूतनीकरण होत नाही. त्यासाठी पुन्हा नवा अर्ज करून नवा परवाना काढावा लागतो. जवळपास १३१ देशांमध्ये हा परवाना ग्राह्य मानला जातो.
वैद्यकीय प्रमाणपत्र
आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी सीएमवी-४ फॉर्म भरल्यानंतर त्यावर डॉक्टरची सही घ्यावी लागते. परवान्यासाठी अर्ज करत असताना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याची तपासणी डॉक्टरांच्याकडून होते.
आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- भारतीय वाहन परवाना
- पासपोर्ट पुढील सहा महिन्यांसाठी वैध
- अर्जासोबत चार पासपोर्ट आकाराचे फोटो
- व्हिजाच्या दोन कॉपी
- पासपोर्टची कॉपी, परदेशातील जाण्या-येण्याच्या तिकिटाची कॉपी
- एक हजार रुपये शुल्क
दहा वर्षांच्या तुलनेत संख्या घटली
२०१५ ते ऑक्टोबर २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढण्यासाठी संख्या अधिक होती. या कालावधीत कोल्हापूरकांनी पाच हजार आंतरराष्ट्रीय परवाने काढले होते. मात्र काही देशात सुरू झालेले युद्ध, बदलेली सामाजिक परिस्थिती, नोकरीवर गंडातर, कौटुंबिक अडचणीमुळे मायदेशी परत आले. सध्या ही संख्या दुप्पटीने कमी झाली आहे.आंतरराष्ट्रीय परवाने का?
काही देशात भाडेतत्त्वावरील कार परवडण्यासारखी नसते. काहींचा दररोजचा प्रवास असतो. त्यामुळे नोकरीसाठी परदेशात गेलेले बहुतांशी लोक आंतरराष्ट्रीय परवाने काढतात.
परवान्याची संख्या
२०२०-२१ : १२३
२०२१-२२: २९२
२०२२-२३ : ४४०
२०२३-२४ : ४०३
२०२४-२५ (ऑक्टोबरअखेर) ३६५
सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आठवडाभरात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो. त्यासाठी एक हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. -संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी