कोल्हापूर : ऐतिहासिक दसरा चौकाची दुरवस्था, मोदी विचार मंचचे महापालिका आयुक्तांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:11 IST2018-07-06T13:10:13+5:302018-07-06T13:11:20+5:30
कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौक मैदान अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असून, त्याकडे महापालिकेच्या प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक मैदानाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी ‘नरेंद्र मोदी विचार मंच’तर्फे गुरुवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनील सामंत, दीपाली खाडे, गणेश लाड, संजय चव्हाण, बाळासाहेब इंडीकर, राहुल नाईक, भारत मोरे उपस्थित होते.
कोल्हापूर : येथील ऐतिहासिक दसरा चौक मैदान अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असून, त्याकडे महापालिकेच्या प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मैदानाची दुरवस्था थांबवून त्याचे वैभव वाढावे यासाठी येत्या एक महिन्याच्या आत महानगरपालिकेने प्रयत्न करावेत; अन्यथा संघटनेच्या वतीने सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ‘नरेंद्र मोदी विचार मंच’तर्फे गुरुवारी महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आला.
संस्थानकाळापासून ज्या ऐतिहासिक मैदानावर पारंपरिक पद्धतीने राजेशाही विजयादशमीनिमित्त सीमोल्लंंघन, शमीपूजन सोहळा पार पडतो. त्याची देशभर ख्याती आहे; परंतु या मैदानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे तिथे दुर्गंधी पसरली आहे.
मैदानावर वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग झालेले असते. अनेकजण लघुशंकेसाठी याचा वापर करतात. मद्यपींचाही येथे राजरोसपणे अड्डा जमलेला असतो. केएमटी बसथांबा आणि नियंत्रण कक्षाच्या केबिनने मैदानाचा एक भाग व्यापून गेला आहे. आता पावसाळ्यात चिखलामुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात ‘मोदी विचार मंच’चे शहर संघटन प्रमुख सुनील सामंत, दीपाली खाडे, गणेश लाड, संजय चव्हाण, बाळासाहेब इंडिकर, राहुल नाईक, रोहित चव्हाण, भारत मोरे यांचा समावेश होता.