कोल्हापूर : राजेंद्र मदने, आंबोलीतील मलबार नेचर संस्थेस ‘वसुंधरा’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:30 IST2018-09-26T16:22:52+5:302018-09-26T16:30:11+5:30
राजेंद्र मदने यांना ‘वसुंधरा सन्मान’ , आंबोलीतील मलबार नेचर क्लब संस्थेस ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती उदय गायकवाड आणि कृष्णा गावडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर : राजेंद्र मदने, आंबोलीतील मलबार नेचर संस्थेस ‘वसुंधरा’ पुरस्कार
कोल्हापूर : ‘प्रदूषण टाळा-नदी वाचवा’ या संकल्पनेवर आधारित नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दि. १ ते ४ आॅक्टोबर दरम्यान राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे. त्यामध्ये नदी पुनरूज्जीवनासाठी काम करणाऱ्या राजेंद्र मदने यांना ‘वसुंधरा सन्मान’ , आंबोलीतील मलबार नेचर क्लब संस्थेस ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती उदय गायकवाड आणि कृष्णा गावडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
गायकवाड म्हणाले, या महोत्सवाचे उदघाटन सोमवारी (दि. १ आॅक्टोबर) सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते, तर किर्लोस्कर उद्योग समूहाचे संजीव निमकर, चंद्रहास रानडे, टी. विनोदकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. पी. डी. राऊत, ‘सायबर इन्स्टिट्यूट’चे डॉ. एस. डी. कदम, डॉ. अनिल कुलकर्णी यांना ‘वसुंधरा गौरव’, तर मलबार नेचर क्लबला, राधानगरीमधील तुषार साळगावकर, छायाचित्रकार बी. डी. चेचर यांना ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार मंगळवारी (दि.२) सायंकाळी पाच वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
गुरूवारी (दि.४) सायंकाळी पाच वाजता नदी पुनरूज्जीवनासाठी काम करणाऱ्या मदने यांना ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्या हस्ते ‘वसुंधरा सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. या पत्रकार परिषदेस अजेय दळवी, अनिल चौगुले, विजय टिपुगडे, केदार मुनीश्वर, राहुल पवार, ऐश्वर्या मुनीश्वर, भाऊ सूर्यवंशी उपस्थित होते.