कोल्हापूर : अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाजातर्फे मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 14:32 IST2018-06-04T14:32:27+5:302018-06-04T14:32:27+5:30
डोक्याला भंडारा, पिवळ्या टोप्या, फेटे अन् पारंपरिक वाद्ये, होळकरशाहीची वैशिष्ट्ये सांगणारे फलक अशा उत्साही वातावरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुुकीत विशेषत: महिलांची संख्या जास्त होती. यावेळी राज्यातील सरकारच्या विरोधात फलक आणण्यात आले होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त रविवारी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ मल्हार सेना व युवक संघटनेतर्फे कोल्हापुरातील दसरा चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत धनगर समाजबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापूर : डोक्याला भंडारा, पिवळ्या टोप्या, फेटे अन् पारंपरिक वाद्ये, होळकरशाहीची वैशिष्ट्ये सांगणारे फलक अशा उत्साही वातावरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुुकीत विशेषत: महिलांची संख्या जास्त होती. यावेळी राज्यातील सरकारच्या विरोधात फलक आणण्यात आले होते.
महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, मल्हार सेना व युवक संघटना, कोल्हापूर जिल्ह्यातर्फे दसरा चौकातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर शोभा बोंद्रे, पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व माजी आमदार विनय कोरे, आदींच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला शोभा बोंद्रे व विनय कोरे यांनी पुष्पहार अर्पण केला.
मिरवणुकीत गगनबावडा येथील गजीनृत्य, धनगरी ढोल, बेंजो अशी पारंपरिक वाद्ये, नाचणारा घोडा आणण्यात आला होता. यावेळी समाजबांधवांनी पिवळ्या टोप्या आणि फेटे परिधान केले होते. रिक्षांवरील होळकरशाहीचे फलक, धनगरी ढोल, गजीनृत्य अशा वातावरणात बग्गीसह मिरवणुकीला सुरुवात झाली.
बिंदू चौक, शिवाजी चौक, महापालिका, सीपीआर चौकमार्गे पुन्हा दसरा चौकात येऊन मिरवणुकीची सांगता झाली.
मिरवणुकीत बबन रानगे, जिल्हाध्यक्ष बाबूराव बोडके, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, संभाजीराव जगदाळे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, साजिद खान, नगरसेवक राजसिंह शेळके, मोहन सालपे, तौफिक मुल्लाणी, किशोर घाटगे, प्रा. विश्वास देशमुख, प्रा. शहाजी कांबळे, भाऊसाहेब काळे, शहाजी सिद, बाबूराव बोडके, छगन नांगरे, बाळासाहेब दार्इंगडे, राघू हजारे यांच्यासह धनगर समाजबांधव व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.