...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:05 IST2025-11-18T18:03:05+5:302025-11-18T18:05:24+5:30
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये दोन कट्टर नेते नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत.

...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये दोन कट्टर नेते नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. अनेक वर्षाच्या राजकीय संघर्षानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आले आहेत. या दोन्ही नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कागलच्या विकासाठी एकत्र आल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना घाटगे यांनी अदृश्य शक्तीचा हात असाच राहिला तर ही युती बराच काळ टीकेल, असा संदेशही दिला. दरम्यान, आता या युतीमुळे कागल तालुक्यातील राजकारण बदलले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राजकीय संघर्ष सुरू होता. विधानसभा निवडणूक समरजित घाटने यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात लढवली आहे. या दोन्ही नेत्यांनी या निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. दरम्यान, आता कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत.
समरजित घाटगे काय म्हणाले?
"२०११ ते २०१६ आमची आणि मुश्रीफ यांची युती होती, त्यावेळी आम्ही जो कारभार केला तो लोकांसमोर आहे. त्यामुळे या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलो पाहिजे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आमच्या दोघांमध्ये समन्वय चांगला आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले ते आम्ही सोडवू. आमची युत्ती सत्तेसाठी नाही, कागलच्या विकासासाठी आहे, असंही समरजित घाटगे म्हणाले.
"वरिष्ठ पातळीवर संघर्ष मिटवण्याचे ठरले. यामध्ये मी आणि हसन मुश्रीफ यांनी काही पाऊले पुढे घेतली. आमची बैठक चांगली झाली, बैठकीवेळी कोणासोबत बोलायला वेळ मिळाला नाही. विकासाचे मॉडेल घेऊन गेलो आणि अदृश्य शक्तीचा हात असेल तर ही युती बराच काळ टीकेल अशी अपेक्षा व्यक्त करु, असंही घाटगे म्हणाले.
हसन मुश्रीफ काय म्हणाले?
यावेळी हसन मुश्रीफ यांनीही युतीवर प्रतिक्रिया दिली. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ही कोणत्या परिस्थितीत युती झाली याची माहिती घाटगेंनी दिली. आम्ही काल प्रसार माध्यमांमध्ये भूमिका मांडली होती. अचानक झालेल्या युतीमुळे कोणत्या कार्यकर्त्याचा गैरसमज होऊ नये म्हणून दिलगिरी व्यक्त केली होती. मी काल संजय घाटगे यांच्याबाबत भूमिका व्यक्त केली होती. कागलच्या विकासासाठी संघर्ष सोडून एकत्र येऊन काम करायचे असे ठरवले.