कोल्हापूर : समाज जागृतीसाठी सोमवारपासून जनस्वास्थ्य अभियान, विविध उपक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 17:40 IST2017-12-30T17:34:07+5:302017-12-30T17:40:54+5:30
विद्यार्थी व समाजामध्ये आरोग्य, पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत जागृती व्हावी यासाठी जनस्वास्थ्य दक्षता समितीच्यावतीने १ ते ५ जानेवारी या कालावधीत ‘जनस्वास्थ्य अभियान’ आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर : समाज जागृतीसाठी सोमवारपासून जनस्वास्थ्य अभियान, विविध उपक्रमांचे आयोजन
कोल्हापूर : विद्यार्थी व समाजामध्ये आरोग्य, पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत जागृती व्हावी यासाठी जनस्वास्थ्य दक्षता समितीच्यावतीने १ ते ५ जानेवारी या कालावधीत ‘जनस्वास्थ्य अभियान’ आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, हे अभियान सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. २) शालेय परिसरात स्वच्छता मोहीम, तसेच कचºयापासून खत निर्मिती, फळझाडे लागवड, टेरेसवर भाजीपाला लागवड, सौरऊर्जेचा वापर, निर्धूर चूल, टाकाऊ अन्नपदार्थांपासून बायोगॅस निर्मिती, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. ३) ‘किशोरवयीन लैंगिक समस्या, तरुण वयात घ्यावयाची काळजी’ यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. ४) डॉक्टर कुष्ठरोग, क्षयरोग, मलेरिया, मधुमेह, हृदयरोग यासारख्या आजारांबाबत घ्यायची दक्षता, यावर माहिती देणार आहेत.
शुक्रवारी (दि. ५) गुटखा, तंबाखू, धुम्रपान, मद्य या व्यसनांविरोधात दुपारी चार ते पाच या वेळेत मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. गेली १७ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात एकाच दिवशी व एकाचवेळी ८५० शाळांतील सुमारे अडीच लाख मुले व्यसनांविरोधात घोषणा देत उभी असतात, हे भारतातील एकमेव उदाहरण असेल.
याशिवाय अभियान काळात पोस्टर्स स्पर्धा, सायकल फेरी, पथनाट्याचे आयोजन केले जाणार आहे. यात आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, पोस्टर्स स्पर्धेतील विजेते विद्यार्थी, तसेच दारूबंदी चळवळ राबविलेल्या गावांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस ओंकार पाटील, मिनार देवलापूरकर, बृहस्पती शिंदे, सुधीर हंजे, प्रभाकर मायदेव उपस्थित होते.