कोल्हापूरच्या महानगरपालिका सभेत थेट तिरडी मोर्चा, सत्तारुढ-विरोधी गटातील वादामुळे गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 15:20 IST2017-11-29T14:56:44+5:302017-11-29T15:20:04+5:30

कोल्हापूरच्या महानगरपालिका सभेत थेट तिरडी मोर्चा, सत्तारुढ-विरोधी गटातील वादामुळे गदारोळ
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याच्या प्रश्नावरुन सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भागातील कार्यकर्त्यांसह थेट महानगरपालिकेच्या सभेत तिरडी मोर्चा आणल्याने बुधवारी गदारोळ उडाला. या सभेत विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सत्तारुढ नगरसेवकांवर टीका करताच विरोधकांवरही टीका झाल्यामुळे सभेतच गदारोळ उडाला.
शहराची वाढणारी लोकसंख्या व त्या प्रमाणात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पंचगंगा स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागली आहे. काही लोकप्रतिनिधींनी स्मशानभूमी विस्तारीकरणासाठी निधी व परिसरातील जागा देण्याच्या घोषणा केल्या आहेत; पण फक्त ‘वरकमाई’मागे धावाधाव करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या घोषणांचा पाठपुरावा केला नाही. परिणामी, विस्तारीकरणाअभावी अनेक मृतदेह स्मशानभूमीत पोहोचूनही त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी दहन बेड शिल्लक नसल्याने नातेवाईकांना ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे गेल्या रविवारी स्मशानभूमीत रक्षाविसर्जनसाठी सर्व दहन बेड फुल्ल असल्यामुळे दोन मृतदेह घेऊन आलेल्या नातेवाईकांना अक्षरश: दोन तास रस्त्यावर मृतदेह ठेवून बेड रिकामे होण्याची प्रतीक्षा करावी लागली.
या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि त्यांच्या प्रभागातील कार्यकर्ते बुधवारी आक्रमक झाले. नगरसेवक अफजल पिरजादे, सुनील पाटील, सचिन पाटील, मुरलीधर जाधव, अजिंक्य चव्हाण, संदीप कवाळे यांनी थेट महापालिकेतील सभेतच तिरडी मोर्चा काढून आंदोलन केले.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सभेत तिरडी आणताच गदारोळी माजला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सत्ता असताना नगरसेवक आंदोलन कसे करतात, त्यांनी निधी मंजूर करुन आणायला पाहिजे होता, अशी टीका करताच सत्तारुढ आघाडीच्या नगरसेवकांनीही पालकमंत्रीच निधी पुरवित नसल्याचा आरोप करत गोंधळ घातला. तुमच्या पक्षाचेच पालकमंत्री आहेत, त्यांनी महानगरपालिकेला देणारा निधी आखडता घेतल्याचा आरोप या नगरसेवकांनी करताच पुन्हा गोंधळ माजला.