Kolhapur Municipal Election 2026: आठवणीतील किस्से: अन् महापौरांचे कार्यालय अर्ध्या तासात तोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:02 IST2025-12-18T18:01:07+5:302025-12-18T18:02:14+5:30
का पाडताय म्हणून विचारण्याचे धाडसही कोणाचे झाले नाही

Kolhapur Municipal Election 2026: आठवणीतील किस्से: अन् महापौरांचे कार्यालय अर्ध्या तासात तोडले
भारत चव्हाण
सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष आर.के. पोवार महापौर असतानाचा हा किस्सा. आर.के. म्हणजे शरद पवार यांचे कट्टर समर्थक. जिकडे पवार तिकडे पोवार.! सन १९९४ सालातील गोष्ट असावी. आर.के. ना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी महापौर केले. खणखणीत आवाज, प्रशासनातील बारकावे माहीत असलेला कार्यकर्ता, कामे करून घेण्याची ताकद या सगळ्या गोष्टी आर.के. यांच्याकडे होत्या. त्यांचा प्रशासनावर दांडगा वचक होता.
अधिकारी देखील त्यांच्या शब्दाला मान द्यायचे. न होणारी कामे कायद्यात बसवून करून द्यायचे. आपसूकच शहरातील नागरिकही मोठ्या संख्येने त्यांच्याकडे कामे घेऊन जायचे. महापालिका कार्यालयात ज्यांना जायला जमायचे नाही ते आर.के. यांच्या महाराणा प्रताप चौकातील कार्यालयात जायचे. तेथे पालिकेच्या उर्दू मराठी शाळेच्या दोन मोठ्या खोल्यात महापौरांचे कार्यालय थाटले होते. त्यांनी कार्यालयावर भरपूर खर्च केला होता.
एके दिवशी तत्कालीन खासदार उदयसिंहराव गायकवाड यांनी रंकाळा तलावावर पाहणी दौरा आयोजित केला होता. तलावाचे प्रदूषण, सुशोभिकरण वगैरे कामे करण्याच्या अनुषंगाने ही पाहणी होती. तत्कालीन आयुक्त बलदेवसिंह यांच्यासह महापौरदेखील होतेच. खासदार या नात्याने गायकवाड काही प्रश्न आयुक्तांना विचारत होते. जेवढी माहिती आहे तेवढी आयुक्त सांगत होते. पण ते सांगत असलेली माहिती खोटी असल्याचा समज महापौरांचा होऊ लागला. एका वळणावर तर त्यांचा कडेलोटच झाला. त्यांना संताप अनावर झाला.
आर.के. हे आयुक्तांपेक्षा वयाने मोठे होते. संतापाच्या भरात ‘काय तर सांगू नकोस, आयुक्त हायस की भुसनळा’ असे आर.के. चारचौघात मोठ्याने बोलले. आयुक्त बाहेरच्या राज्यातील असल्याने त्यांना ‘भुसनळा’ म्हणजे काय कळलं नाही. ते काही बोलले नाहीत. शांतच राहिले. पण आर.के. ज्या दिवशी महापौरपदावरून उतरले त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता महापालिकेचे जेसीबी, डंपर घेऊन कर्मचारी आर.के. यांच्या महापौर कार्यालयासमोर पोहचले. अर्ध्या तासात त्यांचे कार्यालय जमीनदोस्त झाले. का पाडताय म्हणून विचारण्याचे धाडसही कोणाचे झाले नाही.