कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना झाली फायनल, केवळ पाच प्रभागात बदल; इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:46 IST2025-10-11T18:45:39+5:302025-10-11T18:46:07+5:30

कुठे झाला बदल.. वाचा

Kolhapur Municipal Corporation's ward structure is final changes in only five wards; Aspirants' attention is on reservation lottery | कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना झाली फायनल, केवळ पाच प्रभागात बदल; इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे

कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना झाली फायनल, केवळ पाच प्रभागात बदल; इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रारुप प्रभाग रचना शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने अंतिम करण्यात आली, परंतु नागरिकांच्या हरकती, सूचनेनुसार त्याची शहानिशा करण्यात आली तेव्हा प्रभाग क्रमांक २, ५, १४, १६ आणि १७ या प्रभागात काही किरकोळ बदल करावे लागले. प्रत्यक्षात तीन प्रभागांना दुसऱ्या प्रभागातील भाग जोडले गेले. त्यामुळे त्याचा परिणाम पाच प्रभागावर झाला.

महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी महिन्यात घेतली जाईल, अशी शक्यता आहे. प्रशासनाची तयारीही त्यादृष्टीने सुरु झाली आहे. या निवडणुकीतील पहिला टप्पा प्रभाग रचना निश्चित करणे हा आता पूर्ण झाला आहे. आता प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करणे आणि आरक्षण टाकणे हे दोन महत्त्वाचे टप्पे बाकी राहिले आहेत. त्याला पुरेसा अवधी आहे.

गेल्या काही महिन्यापासून सर्वात अवघड असलेल्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरु होता. महिनाभर रात्रंदिवस चोखपणे प्रारुप प्रभाग रचना तयार केल्यामुळे त्यात फारसा गोंधळ उडला नाही. प्रारुप प्रभाग रचनेवर महापालिकेकडे ५५ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी आठ हरकती दखल घेण्यासारख्या होत्या. त्या पूर्ण करण्यात आल्या. दोन हरकती अंशत: मान्य करण्यात आल्या आहेत.

कुठे झाला बदल..?

  • हरकतीनुसार तीन प्रभागात बदल करण्यात आले. त्याचा परिणाम मात्र पाच प्रभागांवर झाला.
  • प्रभाग क्रमांक १७ मधील सायबर चौक परिसरातील काही भाग हा प्रभाग क्रमांक १६ ला जोडण्यात आला.
  • प्रभाग क्रमांक ५ मधून सर्किट हाऊस परिसरातील ओम गणेश कॉलनीचा भाग हा प्रभाग क्रमांक दोनला जोडण्यात आला.
  • प्रभाग क्रमांक १४ मधून कलेक्टर ऑफिस समोरील पाटील वाडा ते खानिवलकर पेट्रोल पंप हा परिसर प्रभाग क्रमांक ५ ला जोडण्यात आला.
  • भौगोलिक संलग्नता हे एकमेव कारण प्रभाग रचना बदलण्याचे आहे. एका प्रभागाचे नाव बिरांजे पाणंद असे आहे, त्याठिकाणी शाहू सर्कल चौक असे नाव देण्याची मागणीही हरकतीच्या रुपाने प्राप्त झाली होती. त्यामुळे ‘बिरांजे पाणंद-शाहू सर्कल चौक’ असे नाव देऊन त्यावर पडदा टाकण्यात आला.

Web Title: Kolhapur Municipal Corporation's ward structure is final changes in only five wards; Aspirants' attention is on reservation lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.