कोल्हापूर महापालिकेची चार सदस्यीय प्रभागरचना तयार; जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी सादर करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:02 IST2025-08-05T12:02:31+5:302025-08-05T12:02:56+5:30
लोकसंख्या निकषानुसार वीस प्रभाग

कोल्हापूर महापालिकेची चार सदस्यीय प्रभागरचना तयार; जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी सादर करणार
कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात येत असलेल्या प्रभागरचनेचे काम आता अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे. त्यामुळे प्रशासकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सर्वाधिक वेळ या कामात जात आहे गुरुवारी ही प्रभागरचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वप्रथम प्रभागरचनेचे काम केले जात आहे. लोकसंख्या निकषानुसार वीस प्रभाग तयार केले जात आहेत. त्यापैकी १९ प्रभाग हे चार सदस्यीय, तर एक प्रभाग हा पाच सदस्यांचा असणार आहे. यावेळच्या निवडणुकीत नागरिकांना एकूण ८१ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
गेले महिनाभर प्रभागरचनेचा काम सुरू आहे. आता हे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. प्रत्येक प्रभागाची हद्द त्या त्या ठिकाणी जाऊन तपासण्यात आली. प्रभाग तयार करत असताना रस्ते, कॉलनी याची भौगोलिक सलगता राखताना अधिकाऱ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. त्यासाठी गल्ली, कॉलनी, वसाहती यांची जागेवर जाऊन माहिती घ्यावी लागली आहे.
प्रभागरचना पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यास मान्यता दिल्यावर ती नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली जाईल. त्यानंतर त्यावर हरकती मागविल्या जाणार आहेत. हरकतींची शहानिशा केल्यानंतर ती अंतिम केली जाणार आहे.
२० प्रभागातून ८१ नगरसेवक निवडून येतील. त्यातील ११ जागा अनुसूचित जाती जमातीसाठी २१ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित राहणार आहेत, उरलेल्या ४९ जागा या खुल्या प्रवर्गासाठी असतील. ८१ नगरसेवकांपैकी ४१ पुरुष नगरसेवक, तर ४० महिला नगरसेवक होतील.