कर वाढीला बगल, कोल्हापूर महापालिकेचे १३३४ कोटींचे अंदाजपत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:44 IST2025-03-27T16:44:32+5:302025-03-27T16:44:51+5:30
रस्ते, उद्याने, पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यावर जोर

कर वाढीला बगल, कोल्हापूर महापालिकेचे १३३४ कोटींचे अंदाजपत्रक
कोल्हापूर : महानगरपालिकेचे सन २०२५-२०२६ सालाचे महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग मिळून एकूण १ हजार ३३४ कोटी ७६ लाखांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक बुधवारी उपसमितीमार्फत प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना सादर करण्यात आले. अंदाजपत्रकात नागरिक, सामाजिक संस्था यांच्या सूचना, अपेक्षांचा विचार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
नवीन वर्षात घरफाळा, पाणी पुरवठा शुल्कात कोणतीही कर वाढ प्रशासनाने केलेली नाही. परंतु, नगररचना, अग्निशमन, स्वच्छता, आदी विभागाकडील काही सेवा शुल्कांमध्ये अल्पशी सुधारणा करण्यात आली आहे. उर्वरित सर्व कर मागील वर्षाप्रमाणेच राहणार आहेत. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याकरिता शहरातील रस्ते, उद्यानांची देखभाल दुरुस्ती, पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी स्वनिधीतून तरतूद करण्यात आली आहे.
गतवर्षी सुरू करण्यात आलेल्या विकासकामांची गती वाढवून त्या पूर्णत्वाकडे नेण्याचा संकल्प अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. त्यासाठी विभागीय कार्यालये अधिक सक्षम करीत त्या कार्यालयाकडे जादाचे प्रशासकीय, तसेच आर्थिक अधिकार सुपूर्त केले जाणार आहेत. थोडक्यात एकवटलेले अधिकारांचे विक्रेंद्रीकरण करून प्रशासन गतिमान केले जाईल. महसुली उत्पन्नाची मार्ग मर्यादित असल्यामुळे जास्तीत जास्त महसूल कसा गोळा करता येईल याचाही विचार नवीन आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. शहर स्वच्छता आणि कचरा उठावावर सगळे लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांना सांगितले.
महसुली उत्पन्न ७०७ कोटींचे
सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह महसुली अपेक्षित जमा रक्कम रुपये ७०७.६४ कोटी, तसेच पाणीपुरवठा भांडवली अपेक्षित जमा रक्कम रुपये २२४.९४ कोटी, विशेष प्रकल्पांंतर्गत जमा रुपये ३६०.२२ कोटी, वित्त आयोगाअंतर्गत एकूण जमा ४१.९५ कोटी अपेक्षित आहे. महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग मिळून एकूण १३३४ कोटी ७६ लाख इतके जमेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आहे.
नवीन अर्थसंकल्पामधील प्रमुख उद्दिष्टे
- नागरिकांच्या अपेक्षांचा विचार, उपयुक्त योजनांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश.
- मनपा महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर व खर्चामध्ये वित्तीय शिस्त.
- भांडवली कामाअंतर्गत हाती घेण्यात आलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन.
- कामाचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष.
- आरोग्य व स्वच्छता, शिक्षण कार्यक्रमांची काटेकोर अंमलबजावणी.
- महिला, दिव्यांग कल्याणकारी योजनांवर भर.
- ऑनलाईन सेवा सुविधा पुरविण्यावर भर.
- परिवहन सेवा सक्षमीकरण.
नवीन वर्षासाठी केलेली ठळक तरतुद अशी
- शिक्षण मंडळ पगार, इमारत दुरुस्ती - ६० कोटी
- रस्ते, दुरुस्ती, पॅचवर्क - २० कोटी ५० लाख
- केएमटी पगार, देखभाल दुरुस्ती - २२ कोटी
- आरोग्य विभागाकडे उपकरण खरेदी - १ कोटी
- पार्किंग विकसित करण्याकरिता - १ कोटी
- वर्कशॉप वाहने खरेदी करण्याकरिता - ५ कोटी ५० लाख
- जलतरण तलाव, मैदाने देखभाल - ३ कोटी
- उद्यमनगर सेवा सुविधा - ५० लाख
- आयटी पार्ककरिता - ५० लाख
- महिला बचत गटांचे बाजार-१ कोटी
- स्वच्छता, पार्किंग मॅपिंगकरिता - ३ कोटी
- ट्रक टर्मिनल्स विकसित करण्याकरिता - ३० लाख
- वाचनाल, अभ्यासिकाकरिता ६७ लाख
- रुग्णालय देखभाल, दुरुस्ती - १ कोटी
- महिला बाल कल्याण विभाग - ५ कोटी
- विरुंगळा केंद्र विकसित करणे - २५ लाख
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुविधा - ३ कोटी
- सिमेंट व डांबरी रस्ते जोडणे ५० लाख
- दिशादर्शक फलक, वाहतूक कोंडी कमी करणे - १ कोटी
- हेरिटेज वास्तू संवर्धन व विद्युत कामे - ६० लाख
- पर्यावरण संवर्धनाकरिता - १.६६ कोटी
- हरितीकरण करण्याकरिता- ५० लाख
- इराणी खणी स्वच्छ करण्याकरिता - ५० लाख
- दिव्यांग कल्याणकरारी योजना - ६ कोटी
नवीन काय करणार?
- १५व्या वित्त आयोगांतर्गत २८ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रे मंजूर असून, त्यापैकी १६ केंद्र कार्यरत आहेत. उर्वरित १२ केंद्रे नवीन वर्षात सुरू करण्यात येणार आहेत.
- आरक्षित जागा व टीडीआर माध्यमातून संपादित जागांवर अर्बन डेन्स फॉरस्टरी उभारणीसाठी ३.६० कोटींची तरतूद.
- कसबा बावडा येथील जागेवर २० टीपीडी क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी अमृत -२ मधून ३ कोटी ६१ लाखांची तरतूद.
- महापालिकेकडे १७३ ऑटो टिपर आहेत, अजून ३० ऑटो टिपर्स खरेदीसाठी डीपीडीसीकडे प्रस्ताव सादर
२०२५-२६ सालाची अपेक्षित महसुली जमा
स्थानिक संस्था करपोटी अनुदान - २३५ कोटी ४० लाख
घरफाळा - १०१.१६ कोटी
मार्केट भाडे - ४२.०४ कोटी
इतर संकीर्ण जमा - ९०.७४ कोटी
शासकीय अनुदान - ७.२८ कोटी
नगररचना शुल्क - ९१.२१ कोटी
परवाना शुल्क - ५.५० कोटी
आरोग्य विभाग - ३.८१ कोटी
पाणी हंसील, सांडपाणी अधिभार - ८७ कोटी
जल लाभ कर - ४.१० कोटी
एकूण जमा - ७०७.६४ कोटी
२०२५-२६ सालचा अपेक्षित महसुली खर्च
आस्थापना, पेन्शन, मानधन - ३६८.४२ कोटी
कार्यालयीन खर्च, देखभाल दुरुस्ती - ११.२३ कोटी
सिंचन पाणीपट्टी - १०.०० कोटी
शिक्षण मंडळ निधी - ६४.५० कोटी
रस्ते दुरुस्ती - ८.०० कोटी
संगणकीकरण - १.८० कोटी
पाणी हंसील तुटभरपाई - २३.२० कोटी
स्वनिधीतून भांडवलीकडे वर्ग - ४४.३३ कोटी
विद्युत खर्च - ५९.४१ कोटी
इतर खर्च - ७७.६८ कोटी
केएमटी अर्थसाहाय्य - १८.०० कोटी
केमिकल, पाइपलाइन देखभाल - २.४० कोटी
एकूण खर्च - ७०७.६४ कोटी