कोल्हापूर महापालिकेसाठी ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत, उत्सुकता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:24 IST2025-10-28T12:24:00+5:302025-10-28T12:24:37+5:30
राजकीय पातळीवरही हवा तापू लागली

कोल्हापूर महापालिकेसाठी ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत, उत्सुकता वाढली
कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण निश्चित करण्याचा दिवस ठरवून दिला असून आता मंगळवार दि. ११ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता ही आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाची सोडत कधी निघणार याबाबत लागून राहिलेली उत्सुकताही संपुष्टात आली, पण कोणते आरक्षण पडणारी ही उत्सुकता मात्र वाढली. राजकीय पातळीवरही निवडणूकीची हवा तापू लागली आहे.
महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया एक-एक टप्प्यावरून पुढे सरकत आहे. या आधीच प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. आता प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू असतानाच सोमवारी निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार दि. ११ नोंव्हेबरला ही सोडत काढली जाणार आहे. आरक्षणाचा प्रक्रिया कशी राबवावी, याबाबतच्या मार्गदर्शन सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम सुरू असल्याने आरक्षण सोडत काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल, सर्कीट हाऊस हॉल किंवा देवल क्लबचे गोविंदराव टेंभे सभागृह यापैकी एका ठिकाणाची निवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आरक्षणाचा कार्यक्रम असा
अ) प्रारूप आरक्षणास मान्यता घेणे
आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरिता प्रस्ताव सादर करणे - ३० ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर
ब) आरक्षण सोडत
आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध करणे - ८ नोव्हेंबर
आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे - ११ नोव्हेंबर
क) हरकती व सूचना
प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिद्ध करणे- १७ नोव्हेंबर
प्रारूप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याचा अंतिम दिनांक - २४ नोव्हेंबर
ड) अंतिम आरक्षण -
- प्रारूप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी निर्णय घेणे - २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर
- आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे - २ डिसेंबर
प्रारुप मतदार यादी ६ नोव्हेंबरला
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दि. ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.
महानगरपालिकेकडून या कामासाठी सर्व सहायक आयुक्तांना प्राधिकृत अधिकारी, तर उपशहर अभियंत्यांना सहायक प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रारुप मतदार यादी तयार करण्यासाठी विभागनिहाय भाग संबंधित विभागीय कार्यालयांना वितरित करण्यात आले असून, त्यावर कंट्रोल चार्ट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
सोमवारी दुपारी स्थायी समिती सभागृहात सर्व प्राधिकृत अधिकारी, सहायक प्राधिकृत अधिकारी व पर्यवेक्षकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत कंट्रोल चार्ट तयार करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली तसेच पर्यवेक्षकांच्या शंका व समस्या दूर करण्यात आल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे व निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड व पर्यवेक्षक उपस्थित होते.
बीएलओ व पर्यवेक्षक प्रत्यक्ष प्रभागात जाऊन मतदार यादीशी संबंधित काम करणार असल्याने नागरिकांनी भागात येणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.