कोल्हापूर महापालिकेतील ड्रेनेज घोटाळा: टक्केवारीचा आरोप असलेले तीन अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:52 IST2025-07-30T11:52:00+5:302025-07-30T11:52:38+5:30
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला

कोल्हापूर महापालिकेतील ड्रेनेज घोटाळा: टक्केवारीचा आरोप असलेले तीन अधिकारी निलंबित
कोल्हापूर : कसबा बावडा ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामात पैसे घेतल्याचा आराेप असलेल्यांवर महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला असून, मंगळवारी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकाउंटंट विभाग प्रमुख तथा सहायक अधीक्षक बळवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपीक जयश्री हंकारे यांना तडकाफडकी निलंबित केले.
महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ व वरिष्ठ लेखापरीक्षक सुनील चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यास मान्यता देण्यात आली. निवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, निवृत्त उप-शहर अभियंता रमेश कांबळे व पवडी अकाउंटंट निवृत्त कनिष्ठ लिपीक प्रभाकर नाईक यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशी समितीस ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
शहरातील कसबा बावडा पूर्व बाजू अंतर्गत जाधव यांचे घर ते बडबडे मळापर्यंत ड्रेनेज पाइप टाकण्याच्या कामाचे अधिकाऱ्यांनी काम न करता ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांचे ७२ लाखांचे बिल दिल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांनी केला होता. चार दिवसांनी ठेकेदार वराळे याने कनिष्ट अभियंता यांच्यापासून अतिरिक्त आयुक्त यांच्यापर्यंत किती आणि कसे पैसे दिले, याचा आरोप केला होता. या दोन्ही आरोपांमुळे महापालिकेत खळबळ उडाली. त्यातून भ्रष्टाचाऱ्यांची एक साखळी उघड झाली. या घटनेमुळे महापालिकेच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का बसला.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती केली आहे. या चौकशी समितीला या सर्व प्रकरणाचा अहवाल सात दिवसांच्या आत देण्याचे निर्देश दिले होते, परंतु मंजूलक्ष्मी यांनी मंगळवारी या चौकशी समितीला ४८ तासांच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये जे जे अधिकारी व कर्मचारी कागदपत्राच्या व पुराव्याच्या आधारे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.
प्रशासकांचा पहिला दणका
प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी या भ्रष्टाचाराची गंभीर दखल घेतली आहे. यातून कोणाची सुटका नाही, असा इशारा दिला आहे. मंगळवारी त्यांनी पहिला दणका दिला. प्रथमदर्शनी या प्रकारात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकाउंटंटचे सहायक अधीक्षक बळवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपीक जयश्री हंकारे यांना निलंबित करून घरी घालविले.
फिर्यादीच झाल्या निलंबित..
ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांनी या कामासाठी ज्यांनी टक्केवारीने रकमा घेतल्या त्यामध्ये कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांच्याबद्दलही तक्रार केली होती. त्यांना गुगलपे ने ८० हजार पाठविल्याचा स्क्रीन शॉटच त्यांनी माध्यमांना पुरवला होता. गंमत म्हणजे त्याच वराळे याच्याविरोधातील फिर्यादी आहेत. आता त्यांनाच महापालिकेने निलंबित केले, मग पोलिस गायकवाड यांच्याकडून कोणत्या तोंडाने माहिती घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.