कोल्हापूरच्या आयुक्त नियुक्तीचे तीन-तेरा; पालकमंत्री ठरले खोटे, ‘अडचण’ कुणाची आणि कसली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 17:34 IST2023-08-09T17:33:36+5:302023-08-09T17:34:02+5:30
एका संघटनेने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना साकडे घातले

कोल्हापूरच्या आयुक्त नियुक्तीचे तीन-तेरा; पालकमंत्री ठरले खोटे, ‘अडचण’ कुणाची आणि कसली?
कोल्हापूर : जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याबद्दलही नेतेमंडळी किती ठामपणे बोलतात आणि उघडी पडतात याचे उत्तम उदाहरण म्हणून कोल्हापूरच्या आयुक्त नियुक्तीकडे पाहावे लागेल. पालकमंत्री दीपक केसरकर हे तीन दिवसांत कोल्हापूरला आयुक्त देणार होते. या आश्वासनाला तेरा दिवस उलटून गेले तरीही आयुक्त मिळालेच नाहीत. केसरकर खोटे आश्वासन देऊन कोल्हापूरला का फसवत आहेत, अशी विचारणा होऊ लागली आहे.
कादंबरी बलकवडे यांची बदली होऊन दोन महिने होऊन गेले तरी अजूनही आयुक्त नियुक्ती झालेली नाही. २४ जुलैला पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी तीन दिवसांत आयुक्त हजर होतील, असे सांगून टाकले. या गोष्टीला आता तेरा दिवस उलटून गेले तरीही आयुक्तांची नियुक्ती झालेली नाही. मधल्या काळात दोनवेळा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या; परंतु त्यातही कोल्हापूरला वंचित ठेवण्यात आले. मग पालकमंत्र्यांनी तीन दिवसांची मुदत कोणाच्या जिवावर दिली, अशी विचारणा होऊ लागली आहे.
महापालिका निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे आपापल्या सोयीचा अधिकारी या ठिकाणी आणण्यासाठी भाजप, शिंदे गटात रस्सीखेच असल्याचे सांगितले जाते. तुमच्यातील रस्सीखेचीशी जनतेला देणे-घेणे नाही. त्यांना झटक्यात निर्णय घेऊन शहरवासीयांचे प्रश्न सोडवणारा धडाडीचा अधिकारी हवा आहे; परंतु मुंबईचे असो किंवा स्थानिक नेते असो हे जर ‘आमचे समाधान करणारा अधिकारी पाहिजे’ यासाठी हा विलंब करत असतील तर ते धोकादायक आहे.
‘अडचण’ कुणाची आणि कसली?
राज्यात सध्या महायुती सत्तेत आहेत. एकाएकापेक्षा तीन-तीन धडाडीचे नेते सरकार चालवत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे निर्णय फटाफट होतात, असेही सांगितले जाते. मग कोल्हापूरच्या आयुक्तपदासाठी अधिकारी देताना नेमकी कुणाला आणि कसली अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनाच साकडे
वेगळ्या प्रकारच्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरातील एका संघटनेने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना साकडे घातले आहे. तुम्ही कोल्हापूरचे जावई असताना आणि तुमच्या पक्षाचे सरकार राज्यात सत्तेत असताना आयुक्त का मिळत नाही, अशी विचारणा मेलद्वारे शहा यांना केली आहे.