Kolhapur: सहायक आयुक्त आकोडेंसह उपशहर अभियंत्यावर कारवाई, २९ कर्मचाऱ्यांचा पगार कपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:36 IST2025-04-08T12:35:54+5:302025-04-08T12:36:24+5:30
प्रशासकांची कारवाई

Kolhapur: सहायक आयुक्त आकोडेंसह उपशहर अभियंत्यावर कारवाई, २९ कर्मचाऱ्यांचा पगार कपात
कोल्हापूर : महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी दुपारी एक वाजता गांधी मैदान विभागीय कार्यालयाची अचानक तपासणी केली. यावेळी विभागीय कार्यालयात प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त नेहा आकोडे, उपशहर अभियंता महादेव फुलारी यांच्यासह २९ कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी या सर्वांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई केली.
शहरातील नागरिकांना महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सुविधा उदा. पाणी पुरवठा, मलनि:सारण, स्वच्छता, पथदिवे, रस्ते, सांडपाणी इत्यादी बाबत वेळोवेळी येणाऱ्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी प्रभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु प्रभाग क्षेत्रीय अधिकारी विभागीय कार्यालयामध्ये उपलब्ध होत नसल्याने मुख्य कार्यालयामध्ये नागरिकांना तक्रारी निराकरणासाठी यावे लागते.
या तक्रारी विभागीय कार्यालयस्तरावर सोडविण्यासाठी विभागीय कार्यालय क्र.१ ते ४ मधील सर्व प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, उपशहर अभियंता व संबंधित कर्मचाऱ्यांनी दर आठवड्यातील सोमवारी व मंगळवारी सकाळचे सत्रामध्ये विभागीय कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी समक्ष विभागीय कार्यालय स्तरावरच निर्गत करण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या आहेत.
सोमवारी गांधी मैदान विभागीय कार्यालयाची प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी अचानक तपासणी केली असता प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त नेहा आकोडे, उपशहर अभियंता महादेव फुलारी व या कार्यालयातील २९ कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
अधिकारीच भेटत नाहीत
विभागीय कार्यालयातील अधिकारी, अभियंता तसेच अन्य कर्मचारी नागरिकांना भेटत नाहीत. कधीही कार्यालयात चौकशी केली तरी एक तर भागात फिरती किंवा मुख्य कार्यालयात गेले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नागरिक वैतागून गेलेले असतात. तक्रार करायची तर कोणाकडे असा त्यांना प्रश्न पडतो. अधिकारी, कर्मचारी भेटत नसल्याने नाईलाजास्तव अनेक नागरिक थेट प्रशासकांना भेटायला जातात.