कोल्हापूर :घरकुल चोरीप्रकरणी कारवाईस जिल्हा परिषदेकडून चालढकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:18 IST2018-11-15T13:11:42+5:302018-11-15T13:18:40+5:30
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील घरकुल योजनेतील घरे चोरून शासकीय निधीची लुबाडणूक करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी शरद्चंद्र माळी, ग्रामसेवक अतुल इरनक, लिपिक महादेव चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी वर्षभरापूर्वी दिले होते; पण जिल्हा परिषदेने आजअखेर कोणतीही कारवाई केलेली नाही.

कोल्हापूर :घरकुल चोरीप्रकरणी कारवाईस जिल्हा परिषदेकडून चालढकल
कोल्हापूर : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील घरकुल योजनेतील घरे चोरून शासकीय निधीची लुबाडणूक करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी शरद्चंद्र माळी, ग्रामसेवक अतुल इरनक, लिपिक महादेव चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी वर्षभरापूर्वी दिले होते; पण जिल्हा परिषदेने आजअखेर कोणतीही कारवाई केलेली नाही.
जाणीवपूर्वक चालढकल केली जात असल्याचा निषेध म्हणून आणि तातडीने कारवाई व्हावी, या मागणीसाठी १० डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा देणारे निवेदन हातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समितीने बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायत विभागाला दिले.
मौजे तळसंदे (ता. हातकणंगले) येथे घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्याबद्दल हातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समितीने पुराव्यासह जून २०१७ मध्ये जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. पावसाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा होऊन ग्रामविकास मंत्र्यांनी तातडीने फौजदारी कारवाई करावी, असे आदेश दिले होते.
या घटनेला दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी जिल्हा परिषदेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. या संदर्भात हातकणंगले गटविकास अधिकारी शरद्चंद्र माळी यांनी ग्रामसेवक अतुल इरनक व लिपिक महादेव चव्हाण यांच्यावर कारवाईसंदर्भात शासनाकडून आलेल्या आदेशाचेही पालन केले नाही.
लिपिक चव्हाण यांनी पत्नीच्या नावे ग्रामपंचायतीची मिळकत हडप केली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी दप्तरात खाडाखोडही केल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात जानेवारी २०१८ मध्ये फौजदारी गुन्हाही दाखल झाला आहे.
या घरकुल चोरीत लिपिक, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी हे तिघेही दोषी असताना केवळ खाडाखोड केल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करून इतरांना वाचविण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वत: गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चुकीचा अहवाल पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप हातकणंगले तालुका कृती समितीने निवेदनातून केला आहे.
या संदर्भात ६ जुलैला २०१८ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तक्रार आली नसल्याचे सांगितले. ‘आपले सरकार पोर्टल’वर आॅनलाईन तक्रार नोंदविली असतानाही तक्रारच नसल्याचे ‘महासरकार’च्या प्रतिनिधीने उत्तर दिले आहे.
या सर्वांचा निषेध व दोषींवर तातडीने कारवाई व्हावी म्हणून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हा परिषदेत सुभाष मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळात डी. आर. चव्हाण, अ. वा. शिंदे, बा. बा. चव्हाण, भरत कांबळे, कृ. आ. चव्हाण यांचा समावेश होता.