कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:38 IST2025-08-06T18:36:21+5:302025-08-06T18:38:40+5:30
Kolhapur Mahadevi Elephant : वनताराचे प्रशासकीय पथक दुसऱ्यांदा कोल्हापुरात दाखल झाले आहे.

कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
Kolhapur Mahadevi Elephant : मागील काही दिवसांपासून कोल्हापुरातील महादेवी हत्तीला वनतारामधून परत आणण्यासाठी आंदोलन सुरू झाले आहे. नांदणी गावापासून सुरू झालेले आंदोलन आता जिल्हाभरात सुरू झाले आहे. हत्तीला परत मठामध्ये आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वी वनताराचे पथकाने कोल्हापुरात येऊन महास्वामींची भेट घेतली होती. तर दुसरीकडे, राज्य सरकारनेही हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काल बैठकीत सांगितले.
दरम्यान, आज सकाळी वनताराच्या प्रशासकीय पथकाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी महादेवी हत्तीसाठी नांदणीमध्ये मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारणार असल्याचे सांगितले. तर आता वनताराचे पथक दुसऱ्यांदा कोल्हापुरात दाखल झाले आहे. हे पथक नांदणीच्या महास्वामींची भेट घेणार आहे.
याआधीही वनताराचे पथक कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी महास्वामींसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी हत्तीणीला परत आणण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सुप्रीम कोर्टात मठासोबत राज्य सरकारही असेल असं फडणवीस यांनी सांगितले होते. दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची वनताराच्या पथकाने भेट घेतली. या भेटीनंतर महादेवी हत्ती पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
"राज्य सरकार महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून यामध्ये वनताराही आपल्याला मदत करणार असल्याची माहिती आज फडणवीस यांनी दिली. यानंतर लगेचच काही तासानंतर वनताराचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. कोल्हापुरात महास्वामींची हे पथक भेट घेणार आहे. या भेटीत महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.