कोल्हापूर : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीचे आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:49 IST2018-06-20T16:49:12+5:302018-06-20T16:49:12+5:30
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या दोन्ही ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवून कोल्हापुरातील व्यक्तीला सहा लाख रुपयांना नाशिक येथील भामट्याने गंडा घातला. संशयित महादेव संतराव कागीणकर (रा. विशाखा कॉलनी, राजीवनगर, नाशिक) असे त्याचे नाव आहे.

कोल्हापूर : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीचे आमिष
कोल्हापूर : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या दोन्ही ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवून कोल्हापुरातील व्यक्तीला सहा लाख रुपयांना नाशिक येथील भामट्याने गंडा घातला. संशयित महादेव संतराव कागीणकर (रा. विशाखा कॉलनी, राजीवनगर, नाशिक) असे त्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, राजाराम दौलतराव पाटील (रा. दत्त कॉलनी, मंगळवार पेठ) यांची संशयित महादेव कागीणकर यांच्याशी ओळख झाली. यावेळी पाटील यांनी माझ्या मुलीला व जावयाला नोकरीची गरज असल्याचे सांगितले.
त्यावर कागीणकर याने माझी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अधिकाऱ्यांशी चांगली घसट आहे. तुमच्या मुलीचे व जावयाचे नोकरीचे काम करतो. त्यासाठी सहा लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
कागीणकर याच्यावर विश्वास ठेवून पाटील यांनी रेल्वे स्टेशनसमोर त्याला पैसे दिले. मात्र, पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने त्यांनी कागीणकर याच्याकडे पैशांची मागणी केली असता तो टाळाटाळ करू लागला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी मंगळवारी (दि. १९) शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस संशयित भामटा कागीणकर याचा शोध घेत असून, या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.
या फसवणूकप्रकरणी तक्रारदाराने माझी भेट घेतली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
- संजय मोहिते,
पोलीस अधीक्षक