कोल्हापूर : तुम्ही साथ द्या, ‘कोल्हापूर दक्षिण’मधून लढण्यास मी तयार : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 17:21 IST2018-08-17T17:19:13+5:302018-08-17T17:21:16+5:30
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही आणि मी गाफील राहिल्याने माझा बळी गेला. मात्र, आता गट-तट बाजूला सारून, मतभेद दूर करून तुम्ही साथ देणार असाल, तरच ‘कोल्हापूर दक्षिण’मधून २०१९ ची निवडणूक लढविण्यास मी तयार आहे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.

कोल्हापूर : तुम्ही साथ द्या, ‘कोल्हापूर दक्षिण’मधून लढण्यास मी तयार : सतेज पाटील
कोल्हापूर : गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही आणि मी गाफील राहिल्याने माझा बळी गेला. मात्र, आता गट-तट बाजूला सारून, मतभेद दूर करून तुम्ही साथ देणार असाल, तरच ‘कोल्हापूर दक्षिण’मधून २०१९ ची निवडणूक लढविण्यास मी तयार आहे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.
येथील ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कमध्ये आयोजित कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण विभागामधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. करवीर आदर्श महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, समाजातील सर्व घटकांना फसविणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर सारण्यासाठी आगामी निवडणूक महत्त्वाची आहे. सामान्य माणसाला न्याय आणि दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी मी विधानसभा निवडणूक लढवीन. मात्र, त्यासाठी तुमची साथ महत्त्वाची आहे. तुम्ही पुन्हा गाफील राहणार असाल, तर मला पुन्हा विषाची परीक्षा घ्यायला लावू नका. माझा बळी देऊ नका. विधानपरिषदेची माझी आमदारकी २०२२ पर्यंत आहे. जर, विधानसभेची लढाई ताकदीने लढायची असेल, तर तत्पर रहा. ‘घरोघरी काँग्रेस’ मोहिमेच्या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढवा.
या मेळाव्यात बाजार समितीचे संचालक विलास साठे, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, राजू वळीवडेकर, संदीप मोहिते, संजय पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार करण्याची शपथ घेतली. यावेळी करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे, उपसभापती सागर पाटील, बाजार समितीचे संचालक मारुती निगवे, शशिकांत पाटील, विजय पाटील, मनीषा वास्कर, बाबासो माळी, एकनाथ पाटील, भूजगोंड पाटील, युवराज गवळी, प्रताप चंदवाणी, सचिन पाटील, विजय चौगुले, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मोठ्या संघर्षातून यश
ज्या नेत्याने जिल्ह्याला वेठीस धरले, लोकसभेमध्ये मदत करूनही ज्यांनी मला फसविले, अशा नेत्याचा पराभव करण्याचा मान मला मिळाला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर १४ महिन्यांत मोठ्या संघर्षातून मी विधानपरिषदेचा आमदार झालो, हे तुम्हाला माहीत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत संमिश्र, तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ज्या वॉर्डात आपल्या कार्यकर्त्याला लीड मिळते, त्याच ठिकाणी विधानसभेला कमी मते कशी मिळतात? याचा विचार कार्यकर्त्यांनी करावा.