कोल्हापूर : सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी वैचारिक बैठक, चर्चेतून ठरविणार पुढील दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 18:07 IST2018-11-12T18:04:56+5:302018-11-12T18:07:00+5:30
मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील शिफारशींबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी (दि. १५) वैचारिक बैठक आयोजित केली आहे. सायंकाळी पाच वाजता मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक होणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे उमेश पोवार आणि विनोद साळोखे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर : सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी वैचारिक बैठक, चर्चेतून ठरविणार पुढील दिशा
कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील शिफारशींबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी (दि. १५) वैचारिक बैठक आयोजित केली आहे. सायंकाळी पाच वाजता मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक होणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे उमेश पोवार आणि विनोद साळोखे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
उमेश पोवार म्हणाले, आरक्षणाबाबत मराठा समाजाचे कोल्हापुरातील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेताना मंत्री गट उपसमितीने १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येईल. हा अहवाल येण्यापूर्वी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाची अजून पूर्तता झालेली नाही.
आयोगाने केलेल्या शिफारसीवरून पाठिंबा अथवा विरोध करण्याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे. त्यासह आरक्षणासंदर्भात शासनाची चाललेल्या चालढकल विरोधात पुन्हा एकदा सरकारला तत्परतेने निर्णयास भाग पाडणे. मराठा समाजाच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी उद्युक्त करणे, आदींबाबत चर्चा केली जाणार आहे.
या बैठकीस सुमारे एक हजार समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. विनोद साळोखे म्हणाले, जानेवारीमध्ये आरक्षण जाहीर होईल, असे सरकारमधील एका जबाबदार मंत्र्यांनी सांगितले आहे. आरक्षण जाहीर करण्यास विलंब झाल्यास लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास मराठा समाजाची अडचण होणार आहे; त्यामुळे याअनुषंगाने पुढील दिशा ठरविण्यासाठी, खुल्या पद्धतीने चर्चा करण्यासाठी, वैचारिक बैठक आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेस हृषिकेश पाटील, सचिन दामुगडे, अनिकेत पाटील, योगेश पवार, विजय पाटील, अमोल गायकवाड, आदी उपस्थित होते.
फलकाद्वारे सरकारचा निषेध
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतील चुकीचे निकष दूर करणे. आरक्षणासह विविध मागण्यांसाठीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजातील युवकांवरील गुन्हे मागे घेणे, आदींबाबत सरकारकडून चालढकल सुरू आहे. त्याचा निषेध व्यंगचित्रे असलेले डिजिटल फलक दसरा चौकात लावून केला जाणार आहे, असे विनोद साळोखे यांनी सांगितले.