HSC Exam Result 2025: कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला, ९३.६४ टक्के निकाल लागला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:16 IST2025-05-06T13:15:02+5:302025-05-06T13:16:11+5:30

क्रमांक वाढला, टक्का घसरला

Kolhapur division secured second position in the state in the 12th examination with a result of 93 percent | HSC Exam Result 2025: कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला, ९३.६४ टक्के निकाल लागला 

संग्रहित छाया

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.६४ टक्के लागला असून, विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या निकालाची माहिती दिली. गतवर्षी चौथ्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर विभागाने यंदा थेट दुसरे स्थान पटकावले असले, तरी ०.६० टक्क्याने निकाल घटला आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ९४.२४ टक्के लागला होता.

११ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या बारावीच्या परीक्षेत १०१२ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख १३ हजार १९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १ लाख ६ हजार ०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल ९४.४० टक्के लागला असून, सलगपणे प्रथम राहण्याची परंपरा कायम ठेवली. सांगली जिल्ह्याचा ९३.३९ टक्के इतका निकाल लागला असून, विभागात दुसरा क्रमांक मिळवला आहे. सातारा जिल्ह्याचा निकाल ९२.७६ टक्के इतका लागला आहे.

जिल्हा - प्रविष्ट विद्यार्थी - उत्तीर्ण विद्यार्थी - टक्केवारी

  • कोल्हापूर - ४८८३६  - ४६१०५ - ९४.४०
  • सांगली  - ३१२०७ - २९१४५ - ९३.३९
  • सातारा - ३३१५२ - ३०७५४ - ९२.७६
  • एकूण  - ११३१९५ - १०६००४ - ९३.६४


विभागाचा शाखानिहाय निकाल
विज्ञान- ९८.६३, कला- ८१.६९, वाणिज्य- ९४.५३, व्यावसायिक-९२.४०, आयटीआय- ८९.५७.

मुलीच सरस

बारावी परीक्षेत विभागात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.९२ टक्के इतके आहे. तर ९०.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. कोल्हापूर विभागात ५९ हजार ७२६ पैकी ५४ हजार १८१ मुले उत्तीर्ण झाली. तर ५३ हजार ४६९ मुलींपैकी ५१ हजार ८२३ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांपेक्षा ६.२१ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत.

गैरप्रकाराची २५ प्रकरणे

कॉपीमुक्त अभियान विभागात प्रभावीपणे राबवले. प्रत्यक्षात कॉपीचा एकही प्रकार आढळला नसला तरी केंद्रात मोबाइल आढळणे, उत्तरपत्रिकेवर ओळख पटेल असे लिहिणे असे २५ प्रकार विभागात आढळले आहेत.

२ हजार ३३३ विद्यार्थ्यांना सवलत गुण

शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून खेळाडू, एनसीसी, स्काउट-गाइडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलत गुण देण्यात येत आहेत. त्यानुसार यावर्षी राज्यातील सुमारे २० हजार ९४३ तर कोल्हापूर विभागातील २ हजार ३३३ विद्यार्थ्यांना प्रावीण्याचे गुण देण्यात आले आहेत.

कोल्हापूर विभागात प्रथम श्रेणीचे ५ हजार ८२६ विद्यार्थी

राज्यातील नऊ विभागीय मंडळाचा विचार करता प्रावीण्यासह प्रथम श्रेणी (७५ टक्के)च्या पुढे गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कोल्हापूर विभागात कमी आहे. ती ५ हजार ८२६ आहे. प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक मुंबईत ४२ हजार ४८१ तर कोकण विभागात सर्वाधिक कमी १ हजार ५५९ विद्यार्थी आहेत.

कोल्हापूर विभागाचा निकाल हा दर्जात्मक लागला आहे. परीक्षार्थ्यांसाठी शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी विविध उपक्रम, कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविल्याने दर्जा उंचावला आहे. -राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभाग

Web Title: Kolhapur division secured second position in the state in the 12th examination with a result of 93 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.