Kolhapur: ‘केडीसीसी’चा दहा हजार कोटी ठेवीचा विक्रम, ढोबळ नफ्याचा तीनशे कोटींचा टप्पा पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:31 IST2025-04-01T12:31:12+5:302025-04-01T12:31:33+5:30
दहा वर्षांत तब्बल ७ हजार कोटींनी ठेवीत वाढ

Kolhapur: ‘केडीसीसी’चा दहा हजार कोटी ठेवीचा विक्रम, ढोबळ नफ्याचा तीनशे कोटींचा टप्पा पार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल १० हजार काेटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे. प्रशासकीय कारकीर्द संपुष्टात येऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत बँकेच्या ठेवी सात हजार कोटीने वाढल्या आहेत. हा बँकेवर असणारा सामान्य माणसाचा विश्वास अधोरेखित होतो.
जिल्हा बँकेचा संचित तोटा वाढल्याने बँकेवर नोव्हेंबर २००९ मध्ये संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ आणले. नोव्हेंबर २००९ ते मे २०१५ पर्यंत जिल्हा बँकेवर प्रशासकीय मंडळ कार्यरत होते. प्रशासकीय मंडळाने कर्मचाऱ्यांच्या साथीने काही वसुली नेटाने करून संचित कमी करण्याचा प्रयत्न केला.
पण, तरीही मार्च २०१५ मध्ये बँकेचा १०३ कोटी संचित तोटा राहिला. सहकार विभागाने बँकेची निवडणूक लावली आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कार्यरत झाले. मंत्री मुश्रीफ व संचालकांनी बँक व्यवस्थापनाला आर्थिक शिस्त लावत असताना स्वत:पासून काटकसरीचे धोरण अवलंबले.
त्यानंतर, बँकेने प्रगतीला सुरुवात केली. एकीकडे ग्राहकांचा विश्वास निर्माण करत ठेवी वाढीसाठी विशेष मोहीम राबवली. दुसऱ्या बाजूला विविध कर्ज याेजनांच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीचे उद्दिष्ट ठेवले. त्यामुळेच, गेल्या पंधरा वर्षांत ठेवीमध्ये तब्बल ७ हजार कोटीने वाढ होण्याची किमया बँकेने केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजार कोटीने ठेवीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी २४२.६५ कोटींचा ढोबळ नफा होता, यावर्षी तो ३२० कोटींच्या पुढे गेल्याचे समजते.
बँकेची गाडी न वापरणारे अध्यक्ष
सहकारी संस्थांमध्ये अध्यक्षांना गाडी असते. मात्र, २०१५ पासून अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षांसह संचालकांच्या गाड्या बंद करून काटकसरीचे धोरण अवलंबले. बँकेची गाडी न वापरणारे अध्यक्ष मुश्रीफ हे राज्यातील जिल्हा बँकेचे एकमेव अध्यक्ष आहेत.
तुलनात्मक बँकेची झेप..
तपशील | मार्च २०१५ | मार्च २०२४ | मार्च २०२५ |
ठेवी | २८९० कोटी | ९०४४ कोटी | १० हजार कोटी |
कर्जे | २१६७ कोटी | ६९७६ कोटी | ७६०० कोटी |
नफा/तोटा | १०३ कोटी (संचित तोटा) | २४२ कोटी (ढोबळ नफा) | ३२० कोटी (ढोबळ नफा) |