‘लाडक्या बहिणीं’चा अर्ज, कोल्हापूर जिल्हा बँकेचे लगेच कर्ज; राज्यातील पहिली बँक, किती कोटी वाटप केले..जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: June 28, 2025 16:09 IST2025-06-28T16:08:14+5:302025-06-28T16:09:50+5:30

जिल्ह्यात दहा लाख लाभार्थी

Kolhapur District Bank launches loan scheme for women beneficiaries of Ladkya Bhaeen Yojana | ‘लाडक्या बहिणीं’चा अर्ज, कोल्हापूर जिल्हा बँकेचे लगेच कर्ज; राज्यातील पहिली बँक, किती कोटी वाटप केले..जाणून घ्या

‘लाडक्या बहिणीं’चा अर्ज, कोल्हापूर जिल्हा बँकेचे लगेच कर्ज; राज्यातील पहिली बँक, किती कोटी वाटप केले..जाणून घ्या

राजाराम लोंढे

कोल्हापूर : राज्य शासनाच्या लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी जिल्हा बँकेने कर्ज योजना सुरू केली आहे. गेल्या तीन महिन्यांत ५५०० महिलांना बँकेने १६ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. विशेष म्हणजे अवघ्या १० टक्के व्याज दराने व मासिक हप्त्यावर कर्ज दिले जात असल्याने बँकेच्या बहुतांशी शाखांत कर्ज घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे.

राज्यात लाडक्या बहीण योजनेच्या कोट्यवधी महिला आहेत; मात्र त्यांच्यासाठी अगदी सुलभ हप्त्यासह कमी व्याज दराने कर्ज योजना सुरू करणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील एकमेव आहे. जिल्हा बँक म्हटले की पीक कर्ज देणारी अशी ओळख असते, मात्र कोल्हापूर जिल्हा बँकेने गेल्या पाच-सात वर्षांत समाजातील छोट्या छोट्या घटकांसाठी विविध कर्ज योजना सुरू केली आहे. काही कर्ज योजना बँकेने धाडसाने सुरू केल्या आहेत. त्यामुळेच बँकेचे कर्ज वाटप ७५०० कोटींच्या पुढे गेले आहे.

लाडक्या बहिणींना राज्य शासनाच्या वतीने दरमहा दीड हजार रुपये मिळतात. या पैशावर बँकेने त्यांना छोट्या छोट्या व्यवसायासाठी ३० हजार रुपये अवघ्या १० टक्के व्याजाने कर्ज देण्यास १ एप्रिल पासून सुरुवात केली आहे. कर्ज परतफेडीची मुदत तीन वर्षे असून दरमहा ९६८ रुपये हप्ता आहे.

जिल्ह्यात दहा लाख लाभार्थी

राज्य शासनाने १८ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात दहा लाख लाभार्थी असून त्यातील जास्तीत जास्त महिलांना कर्ज पुरवठा करण्याचे धोरण बँकेचे आहे.

विनातारण कर्ज योजना

कर्ज देताना कोणत्याही प्रकारचे तारण घेतले जात नाही. लाडक्या बहीण योजनेतील दोन लाभार्थी महिलांना जामीनदार म्हणून घेतले जाते. फारशी कागदपत्रांची कटकट नसल्याने महिलांचा या कर्ज योजनेकडे ओढा आहे.

बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व संचालकांच्या संकल्पनेतून ही कर्ज योजना सुरू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. - जी. एम. शिंदे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक)

Web Title: Kolhapur District Bank launches loan scheme for women beneficiaries of Ladkya Bhaeen Yojana