Kolhapur: धनंजय महाडिक यांनी इनडोअर स्टेडियमच्या कामाला दिली स्थगिती, सतेज पाटील यांचा आरोप
By भीमगोंड देसाई | Updated: August 19, 2023 21:46 IST2023-08-19T21:42:08+5:302023-08-19T21:46:11+5:30
Kolhapur: खेळाडूंसाठी कोल्हापुरात होणाऱ्या पहिल्या दहा कोटींच्या इनडोअर स्टेडियमच्या कामाला खासदार धनंजय महाडिक यांनी स्थगिती दिली. त्यांनी निधी दुसरीकडे वळवला आहे, असा आरोप माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी केला.

Kolhapur: धनंजय महाडिक यांनी इनडोअर स्टेडियमच्या कामाला दिली स्थगिती, सतेज पाटील यांचा आरोप
- भीमगोंडा देसाई
कोल्हापूर - खेळाडूंसाठी कोल्हापुरात होणाऱ्या पहिल्या दहा कोटींच्या इनडोअर स्टेडियमच्या कामाला खासदार धनंजय महाडिक यांनी स्थगिती दिली. त्यांनी निधी दुसरीकडे वळवला आहे, असा आरोप माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी केला. त्यांचे सरकार आहे. निधी खिरापतीप्रमाणे वाटप केले जात आहे. त्यांनी विकासासाठी शासनाकडून वेगळा दहा कोटींचा निधी आणावा, असेही त्यांनी सूचवले.
आमदार पाटील म्हणाले, आम्ही पाठपुरावा करून दक्षिण विधानसभा मतदारसंघात इनडोअर स्टेडियमसाठी दहा कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्याची निविदा निघाली. वर्क ऑर्डर उद्या देणार म्हणजे आदल्या दिवशी कामाला स्थगिती देण्याचे पाप करण्यात आले आहे. हा खेळाडूंवर अन्याय आहे. इनडोअर स्टेडियमचा वापर विविध खेळाडूंना होणार होता. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेणे शक्य होते. यामुळे काम थांबवणे संयुक्तिक नाही.
शाहू महाराज उमेदवार असतील तर स्वागतच
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. अजून उमेदवार कोण यावर चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडी एकसंध राहून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहे. यातील ४० उमेदवार निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. या मतदारसंघात पुरोगामी विचारांचा उमेदवार असावा, असा आग्रह आहे. या मतदारसंघातून शाहू छत्रपती निवडणूक लढवणार असतील तर स्वागतच आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे.