कोल्हापूर : दादांनी मदत केलीय,भाजपचा महापौर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 14:09 IST2018-09-21T14:04:25+5:302018-09-21T14:09:25+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अपात्रतेची टांगती तलवार घेऊन गेले वर्षभर तणावाखाली वावरणाऱ्या महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुष्पगुच्छ देऊन नगरसेवकांनी पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले, तर पालकमंत्र्यांनी चॉकलेट देऊन नगरसेवकांचे तोंड गोड केले. यावेळी झालेली राजकीय टोलेबाजी मात्र चर्चेचा विषय ठरली.

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मदत केलीय, आता महापौर भाजपचा करा असा सल्ला माजी नगरसेवक सतीश घोरपडे यांनी देताच पालकमंत्र्यांसह सर्वच नगरसेवक असे हास्यसागरात बुडाले. यावेळी सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, दुर्वास कदम, विजय खाडे, संदीप नेजदार, आदिल फरास, किरण शिराळे उपस्थित होते.
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अपात्रतेची टांगती तलवार घेऊन गेले वर्षभर तणावाखाली वावरणाऱ्या महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुष्पगुच्छ देऊन नगरसेवकांनी पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले, तर पालकमंत्र्यांनी चॉकलेट देऊन नगरसेवकांचे तोंड गोड केले. यावेळी झालेली राजकीय टोलेबाजी मात्र चर्चेचा विषय ठरली.
पद रद्द झाल्यावर नगरसेवकांनी गेल्या महिन्यात पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन ‘आम्हाला वाचवा’अशी विनंती केली. पाटील यांनी मदतीची ग्वाही दिली होती. पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला; त्यामुळे सर्व नगरसेवकांना जीवदान मिळाले.
आदिल फरास यांनी आभार मानताना ‘आम्ही आपले ऋणी आहोत’ असे म्हणताच राजू ऊर्फ सतीश घोरपडे यांनी ‘दादांनी मदत केलीय, आता भाजपचा महापौर करा’ असा सल्ला दिला. त्यावेळी सर्वच हास्यसागरात बुडाले. त्याचवेळी प्रा. जयंत पाटील यांनी महापौर नको, दादांनाच खासदार करूया असे सांगितले, तेव्हा मंत्री पाटील यांनी नम्रतापूर्वक हात जोडून या सूचनेला नकार दिला.
यावेळी स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे, गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, नगरसेवक सचिन पाटील, नियाज खान, संदीप नेजदार, किरण शिराळे, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, विनायक फाळके उपस्थित होते.
जयंत पाटील यांचे श्रेय
या प्रकरणी प्रा.जयंत पाटील यांनी नेटाने पाठपुरावा केल्यामुळे तुमचे नगरसेवक पद आणि तुमच्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सदस्यांचे पद वाचल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.