कोल्हापूर शहराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; दुचाकीवर झाड कोसळले, दुचाकीस्वार जखमी
By राजाराम लोंढे | Updated: April 24, 2024 18:41 IST2024-04-24T18:41:19+5:302024-04-24T18:41:27+5:30
उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना सुखद गारवा

कोल्हापूर शहराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; दुचाकीवर झाड कोसळले, दुचाकीस्वार जखमी
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज, बुधवारी सायंकाळी मेघ गर्जना, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने अक्षरशा झोडपून काढले. करवीर पंचायत समिती परिसरात जैन बाेर्डिंग येथे दुचाकीवर झाड कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. वीजेच्या गर्जनेसह झालेल्या पावसाने उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना सुखद गारवा मिळाला.
गेली दोन दिवस जिल्ह्यात पावसाचे वातावरण राहिले. ढगाळ वातावरणामुळे पारा कमी झाला असला तरी उष्मा वाढला होता. सकाळी आठ पासूनच अंगाकडून घामाच्या धारा वाहत होत्या. बुधवारी दुपारपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण झाले. सायंकाळी सहा वाजता आकाशात मेघ गर्जनेसह सोसाट्याचे वारे सुरु झाले.
सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्या मात्र, त्यानंतर जोरदार पाऊस झाला. कोल्हापूरचे तापमान ३९ डिग्रीपर्यंत पोहचल्याने उष्म्याने अंगाची लाहीलाही होत आहे. या पावसाने कोल्हापूरकरांना सुखद गारवा मिळाला.
वीज गायब..
सोसाट्याचा वारा सुरु झाल्यानंतर कोल्हापूर शहरासह उपनगरातील वीज गायब झाली. तब्बल दीड-दोन तास नागरिकांना अंधारातच रहावे लागले.
कचऱ्याचे लोट आकाशात
वारे एवढे जोरात होते, रस्ते, इमारतीचे टेरीस वरील कचरा लोट आकाशात पसरले होते.