गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्यासाठी उद्या कोल्हापूर बंद, सकल मराठा समाजाचा निर्णय
By समीर देशपांडे | Updated: September 4, 2023 13:27 IST2023-09-04T13:26:41+5:302023-09-04T13:27:37+5:30
‘जवाब दो, जवाब दो, महाराष्ट्र सरकार जवाब दो’

गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्यासाठी उद्या कोल्हापूर बंद, सकल मराठा समाजाचा निर्णय
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी उद्या मंगळवारी कोल्हापूर शहर बंद ठेवण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने दसरा चौकात दुपारी निर्दशने करण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, विजय देवणे, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, आदिल फरास, गणी आजरेकर, दिलीप देसाई यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळी साडे अकरापासून दसरा चौकात कार्यकर्ते जमण्यास सुरूवात झाली. यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. ‘जवाब दो, जवाब दो, महाराष्ट्र सरकार जवाब दो’, ‘चुकता होणार, चुकता होणार, हिशोब आता चुकता होणार’,‘एक मराठा, लाख मराठा’,‘या जनरल डायरचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’ अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला.
यानंतर निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी या आंदोलनामागील भूमिका सांगितली. अमानूष लाठीचार्ज करणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षक अन् उपअधीक्षक यांना निलंबित करा, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उद्या, मंगळवारी कोल्हापूर शहर बंदचे आवाहन केले. त्याला सर्वांनीच पाठिंबा दिला.