मराठा समाजातर्फे उद्या कोल्हापूर ‘बंद’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:04 IST2018-08-08T01:04:52+5:302018-08-08T01:04:58+5:30

मराठा समाजातर्फे उद्या कोल्हापूर ‘बंद’च
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळी (जि. अहमदनगर) येथे सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी कोल्हापुरात उद्या, गुरुवारी पुकारण्यात आलेला बंद होईलच, असे सकल मराठा समाजातर्फे दिलीप देसाई, इंद्रजित सावंत व वसंतराव मुळीक यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत जाहीर केले.
दिलीप देसाई म्हणाले, परळी येथील आंदोलन स्थगित झाले असले तरी येथील आंदोलन सुरू राहणार असून, बंदही शांततेत व शिस्तबद्धरीत्या पाळला जाईल. मराठा समाजबांधवांना तसे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत आंदोलनस्थळी भेट देऊन विविध गावे, संस्था, संघटनांच्या माध्यमातून पाठिंब्याची ४८७ पत्रे देण्यात आली आहेत. समाजबांधवांसाठी आचार-संहिता दिली असून तिचे पालन करावे.
इंद्रजित सावंत म्हणाले, सकल मराठा समाजातर्फे उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. याचे अध्यक्षस्थान शाहू छत्रपती भूषविणार आहेत. सभेपूर्वी आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर राष्टÑगीत, शाहू गौरवगीत, महाराष्टÑ गीत व मराठा आरक्षण गीत होईल. या सभेत जिल्ह्यासह राज्यातील मान्यवर वक्ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पाचपर्यंत ही सभा सुरू राहील.
यावेळी प्रा. जयंत पाटील, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, फत्तेसिंह सावंत, स्वप्निल पार्टे, विनायक फाळके, राजू जाधव, आदी उपस्थित होते.
आत्महत्या या मराठा आरक्षणासाठीच
दोन दिवसांपूर्वी झालेल्या विनायक गुदगी यांच्या आत्महत्येचा संबंध मराठा आरक्षणाशी जोडू नये, असे मत पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केले होते. यावर मुळीक म्हणाले, होणाऱ्या आत्महत्या या मराठा आरक्षणासाठीच होत आहेत; कारण मराठा तरुण नोकºया मिळत नसल्याने नैराश्यातून हे पाऊल उचलत आहेत. कोणी काही म्हटले तरी हीच वस्तुस्थिती आहे.