Kolhapur: अंबरग्रीस तस्करी प्रकरण: आधी तस्करांच्या जाळ्यात होते वन्यजीव, आता लक्ष्य सागरी जीव
By संदीप आडनाईक | Updated: December 29, 2025 18:21 IST2025-12-29T18:21:43+5:302025-12-29T18:21:55+5:30
कसा तयार होतो ‘अंबरग्रीस’.. जाणून घ्या

Kolhapur: अंबरग्रीस तस्करी प्रकरण: आधी तस्करांच्या जाळ्यात होते वन्यजीव, आता लक्ष्य सागरी जीव
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोल्हापुरात ‘अंबरग्रीस’च्या तस्करीचे प्रकरण शनिवारी उघडकीस आल्यानंतर शहरात छुप्या पद्धतीने या पदार्थाची तस्करी सुरू असल्याचे उघड झाले आहे. यामुळेच वन्यजीवांप्रमाणेच सागरी जीवांच्या तस्करीकडे प्रकाशझोत टाकणे गरजेचे आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वन्यजीवांप्रमाणेच सागरी जीवांच्या तस्करीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यात सुकवलेले समुद्री घोडे, प्रवाळ, सी-फॅन, शार्क माशांचे पंख आणि ‘अंबरग्रीस’ म्हणजे व्हेलच्या उलटीचा समावेश आहे. राज्याच्या सागरी परिक्षेत्रात व्हेल म्हणजेच देवमाशाच्या काही प्रजातींचा अधिवास आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सागरी परिक्षेत्रात त्यांचा वावर आहे. ‘स्पर्म व्हेल’ या सागरी जीवाच्या उलटीला ‘अंबरग्रीस’ म्हणतात. मात्र, मच्छीमार या माशांना देव मानत असल्यामुळे ते याची शिकार करत नाहीत. अनावधानाने सापडलेल्या ‘अंबरग्रीस’ची खरेदी-विक्री केली जाते. हे दुर्मिळ असल्याने मोठी मागणी आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत १९८६पासून या सागरी सस्तन प्राण्याला संरक्षण आहे.
असा तयार होतो ‘अंबरग्रीस’
‘कटलफिश’ आणि ‘ऑक्टोपस’ हे म्हाकुळ प्रजातीचे मासे ‘स्पर्म व्हेल’ खातात. त्यांच्या काटेरी दातांमुळे शरीरात आतील भागाला दुखापत होऊ नये म्हणून व्हेल पित्ताशयामधून एक विशिष्ट स्त्राव सोडतो. तो या दातांमुळे शरीरात इजा होऊ देत नाही. ‘स्पर्म व्हेल’ उलटीद्वारे हा नको असलेला स्त्राव बाहेर फेकतो, तो विष्ठेद्वारेही त्याला शरीराबाहेर टाकतो, म्हणूनच त्याच्या विष्ठेमध्येही म्हाकुळ माशांचे काटेरी दात आढळतात. हा स्त्राव समुद्राच्या पाण्यात तरंगतो. सूर्यप्रकाश आणि खाऱ्या पाण्यामुळे ‘अंबरग्रीस’ तयार होतो.
व्हेलची उलटी म्हणजे काय
‘अंबरग्रीस’ हा काळा, पांढरा आणि राखाडी रंगाचा एक तेलकट पदार्थ आहे. समुद्रात तरंगताना त्याला अंडाकृती किंवा गोल आकार येतो. तो ज्वलनशील आहे. ‘स्पर्म व्हेल’च्या डोक्यावरील एका अवयवाला ‘स्पर्मेट्टी’ म्हणतात, तो तेलाने भरलेला असतो. ते व्हेलचे वीर्य किंवा शुक्राणू मानतात. म्हणूनच त्याला ‘स्पर्म व्हेल’ म्हणतात. ‘अंबरग्रीस’ला सुगंध नसतो. परंतु, हवेच्या संपर्कामुळे त्यात सुगंध निर्माण होतो. त्यामुळे परफ्यूम तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ‘अंबरग्रीस’ हे परफ्यूममधील सुगंधाला हवेत उडू देत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत प्रति किलो १.५ कोटी रुपयांपर्यंत असू शकते.