कोल्हापूर विमानतळाचा नाईट लॅंडिंगचा प्रश्न प्रलंबित, ..अन् शिंदे, फडणवीसांना समजलं महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 18:48 IST2022-07-26T18:34:13+5:302022-07-26T18:48:15+5:30
कामाला प्राधान्य देण्याची ग्वाही

कोल्हापूर विमानतळाचा नाईट लॅंडिंगचा प्रश्न प्रलंबित, ..अन् शिंदे, फडणवीसांना समजलं महत्त्व
कोल्हापूर : येथील विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा नसल्याने दिल्लीचा दौरा अर्धवट टाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी कोल्हापूरला यावे लागले. त्यामुळे याबाबत विषय निघाल्यानंतर या कामाला प्राधान्य देण्याची ग्वाही या दोघांनीही दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानीच याबाबत चर्चा झाली.
वास्तविक दिल्लीत शिंदे आणि फडणवीस हे राष्ट्रपतींच्या शपथविधीनंतर थांबणार होते. परंतु, कोल्हापूरमध्ये नाईट लॅंडिंगची सोय नसल्याने त्यांना तेथील दौरा अर्धवट टाकून कोल्हापूरला यावे लागले. उशीर व्हायला नको म्हणून हे दोघेही पाटील यांच्या घरातून लवकर उठले.
याचवेळी चार केंद्रीय मंत्री बेळगावला उतरून कोल्हापूरला येऊन पुन्हा बेळगाव मार्गे जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. केवळ कोल्हापूरमध्ये नाईट लॅंडिंगची सोय नसल्याने असा प्रवास करावा लागतो अशी यावेळी चर्चा झाली. त्यावर या कामाला प्राधान्य देण्याची ग्वाही यावेळी शिंदे आणि फडणवीस यांनी दिली. त्यामुळे आता हे काम मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.