Kolhapur: सफाई करताना रांगणा किल्ल्यावर आढळले कीर्तिमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:22 IST2025-03-03T13:21:00+5:302025-03-03T13:22:59+5:30

श्रमदानाने स्वच्छता : निसर्गवेधची दुर्गसंवर्धन मोहीम फत्ते

Kirtimukh was found at Rangana Fort while cleaning in kolhapur district | Kolhapur: सफाई करताना रांगणा किल्ल्यावर आढळले कीर्तिमुख

Kolhapur: सफाई करताना रांगणा किल्ल्यावर आढळले कीर्तिमुख

कोल्हापूर : इतिहासाची साक्ष देत उभा असलेला वनदुर्ग रांगणा किल्ल्याची सफाई करताना दरवाजाच्या उंबऱ्यावर कीर्तिमुख आढळले. कोल्हापुरातील गिर्यारोहण संस्था निसर्गवेध परिवाराने मातीचे ढिगारे हटवून या दरवाजाची पूजा केली आणि रांगोळी काढून फुलांच्या माळांनी सुशोभित केले.

निसर्गवेध परिवार गेली २३ वर्षे रांगणा किल्ल्याचे जतन, संवर्धन करण्यासाठी दुर्गसंवर्धन मोहिम हाती घेते. या किल्ल्यावरील रांगणाई मंदिर, तेथील दगडी दीपमाळ, मारुती मंदिर, महादेव मंदिर, वासुदेवाची घुमटी, हवालदाराचा वाडा, हनुमंते दरवाजा, शिवाजी दरवाजा, चिलखती बुरूज अशा वास्तू श्रमदानाने संवर्धित केल्या आहेत. दि.२४, २५ आणि २६ फेब्रुवारी या तीन दिवसांत संस्थेच्या सदस्यांनी येथे तळ ठोकून कोकण दरवाजा स्वच्छ केला. 

त्यातील कोकण दरवाजा दगड आणि मातीने भरून गेला होता. याच्या पायऱ्याही माती खाली मुजल्या होत्या. निसर्गवेधच्या सदस्यांना या दरवाजाच्या पायऱ्यांवरील माती साफ करताना उंबऱ्यावर कीर्तीमुख आढळले. त्याची स्वच्छता केल्यानंतर सदस्यांनी तो झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवला. दरवाजात रांगाेळी काढून त्याची पूजा केली. या मोहिमेत अभिजित दुर्गुळे, अभिषेक घाटगे, अवधूत पाटील आणि जान्हवी पाटील यांनी भाग घेतला.

रांगणा ऊर्फ प्रसिद्धगड किल्ल्याला शिलाहार, बहामनी आणि शिवकालाचा मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अत्यंत आवडता किल्ला होता, असे इतिहासात संदर्भ आहेत. या किल्ल्यावरील यशवंत, हनुमंते, शिवाजी आणि कोकण असे चार दरवाजे आजही शाबूत आहेत. -भगवान चिले, अध्यक्ष, निसर्गवेध परिवार.

Web Title: Kirtimukh was found at Rangana Fort while cleaning in kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.