Khadse, he is just a jhanki ... a signal from the NCP leader hasan mushreef to give another blow to the BJP | खडसे तो सिर्फ झाँकी है... भाजपाला आणखी धक्के बसण्याचे राष्ट्रवादीकडून संकेत

खडसे तो सिर्फ झाँकी है... भाजपाला आणखी धक्के बसण्याचे राष्ट्रवादीकडून संकेत

ठळक मुद्देभाजपा नेते एकनाथ खडसेंचं महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी खडसेंचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसेंचे स्वागत करताना भाजपला पाया ठिसूळ होतोय याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई - एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याबाबत अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजपा नेत्यांनी दुर्दैवी निर्णय असल्याचे म्हटलंय. तर, महाविका आघाडीतील नेत्यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलंय. ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी खडसे तो सिर्फ झाँकी है... असे म्हणत भाजपला धक्का देणार विधान केले आहे. 

भाजपा नेते एकनाथ खडसेंचं महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी खडसेंचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसेंचे स्वागत करताना भाजपला पाया ठिसूळ होतोय याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. तर, संजय राऊत यांनीही खडसेंच स्वागत करताना, भाजपावर बाण चालवले आहेत. आता, राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही भाजपा नेत्यांसाठी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.  
'एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है', असे म्हणत मुश्रीफ यांनी आणखी नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकांपूर्वी भाजपात गेलेले तसेच काठावरचे अनेकजण राष्ट्रवादीत येतील, असा दावा मुश्रीफ यांनी केला. एकनाथ खडसेंमुळे खान्देशात पक्षाची ताकद वाढेल, त्यांचे राष्ट्रवादी पक्षात आनंदाने स्वागत, असेही मुश्रीफ यांनी म्हटलंय. 

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील, त्यानंतर एकनाथ खडसेंना पुढे काय जबाबदारी देण्यात येणार याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मौन बाळगलं आहे. खुद्द एकनाथ खडसेंनीही कोणत्याही अपेक्षेशिवाय राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं म्हटलं आहे. परंतु एकनाथ खडसेसारख्या ज्येष्ठ नेत्याचा योग्य सन्मान केला जाईल असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे वृत्त आल्यानंतर खडसेंनी जळगावात पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खासदार संजय राऊत म्हणाले की, उनकी कुंडली जम गई होगी, असे म्हणत खडसेंचे महाविकास आघाडीत स्वागत केले आहे. मात्र, आयुष्याच्या या वळणावर, एकनाथ खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपाला रामराम केला. गेल्या 40 वर्षे भाजपासाठी काम करणारे खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे, खडसेंच्या या निर्णयामागे नक्कीच मोठं कारण असणार, उनकी कुंडली जम गई होगी... असे राऊत यांनी म्हटलंय.   

फडणवीस म्हणाले

देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा पाहणी दौऱ्यावर असून पत्रकारांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल त्यांना विचारले होते. त्यावर बोलताना, खडसेंनी भाजपाचा राजीनामा दिल्याची अधिकृत माहिती मला मिळाली नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपली प्रतिक्रिया देतील, अशा शब्दात फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं. तसेच, मला अधिकृत माहिती मिळाल्यानंतर मी यासंदर्भात बोलेल, असंही फडणवीस यांनी म्हटलं. 

दिल्या घरी सुखी राहावं

राष्ट्रवादीत प्रवेशाचा एकनाथ खडसेंचा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे, ज्या पक्षात त्यांचं राजकीय करिअर घडलं. बाजार समितीपासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. तो पक्ष खडसेंनी सोडून जायला नव्हते पाहिजे, असे रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. नाथाभाऊंबद्दल पक्षातील कुणाच्याही मनात दुमत नाही. नाथाभाऊंना पक्षाकडून नक्कीच उभारणी मिळाली असती, पण त्यासाठी काही काळ जाणं महत्त्वाचं असंत. काही न्यायालयीन बाबींची पूर्तता होणं गरजेचं होत. नाथाभाऊ आणचे चांगले मित्र आहेत. पण, आता जिथे गेलेत, तिथं त्यांनी सुखी राहावे, असेही रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे.

Web Title: Khadse, he is just a jhanki ... a signal from the NCP leader hasan mushreef to give another blow to the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.