कोल्हापुरातील केशवराव नाट्यगृहाला आकार, रुफकाम सुरू; तांत्रिक अडचणी दूर झाल्याने कामाला गती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 18:00 IST2025-03-01T17:59:44+5:302025-03-01T18:00:33+5:30
तज्ज्ञ अभियंत्यांची देखरेख

छाया : आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : तमाम नाट्य कलाकार आणि रसिकांची अस्मिता असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बांधकामाने समाधानकारक गती घेतली असून, सध्या रुफ कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील पंधरा दिवसांत हेदेखील काम पूर्ण होऊन नवीन टप्प्यातील कामाला सुरुवात केली जाणार आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहाला दि.८ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री दहा वाजता आग लागून या आगीत नाट्यगृहाच्या छताचा सगळा भाग जळून खाक झाले. राज्य सरकारच्या मदतीतून हे नाट्यगृह पुन्हा एकदा जसेच्या तसे उभे राहत असल्याचे पाहून नाट्य कलाकारांसह कोल्हापूरकरांना त्यांच्या अपेक्षांबाबत एक आशावाद निर्माण झाला आहे.
मुंबईच्या स्ट्रक्टवेल कंपनीकडून नाट्यगृहाची पुनर्रबांधणी केली जात असून ऐतिहासिक वास्तूंच्या दुरुस्तीचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ अभियंत्यांच्या देखरेखीखाली इमारतीचे काम सुरू आहे. सुरुवातीला जळालेले छत उतरवून घेण्यात आले. जेथे भिंतींना तडे गेले होते, त्या भिंती उतरवून घेण्यात आल्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने पुनर्रउभारणी सुरू झाली.
भिंतींचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. इमारतीच्या मागील भिंतीवर असलेला मीनी टॉवर बसविण्यासाठी भिंतीचे काम पूर्ण केले जात आहे. दक्षिण व उत्तर बाजूकडील भिंतींचे मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. भिंतीना गिलावा झाला आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा थरही देण्यात आला आहे. आता अभियंत्यांनी रुफ काम करण्यावर सर्व लक्ष केंद्रीत केले आहे. सुरुवातीला स्ट्रक्चर उभारले जाईल, नंतर छतावर पत्रे बसविले जाणार आहेत. फॅब्रीकेशनची सर्व कामे पूर्ण झाली असून मटेरियल जागेवर आणून ठेवले जात आहे. आता फक्त ते जोडायचे राहिले आहे.
नाट्यगृहाच्या रुफ कामाला सुरुवात झाली आहे. बांधकामातील सर्व तांत्रिक त्रुटी दूर झाल्याने काम जलदगतीने सुरू आहे. रुफ कामदेखील पुढील पंधरा दिवसांत पूर्ण करण्यात येईल. - श्रीनिवास सुलगे, व्यवस्थापकीय संचालक, स्ट्रक्टवेल कंपनी