KDMG through Kolhapur collection of 150 thousand tonnes of waste | केडीएमजीच्या माध्यमातून कोल्हापूरातील तब्बल दीडहजार टन कचऱ्याचा उठाव

कोल्हापूरात केडीएमजीच्या माध्यमातून शनिवारी ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

ठळक मुद्देकेडीएमजीच्या माध्यमातून कोल्हापूरातील तब्बल दीडहजार टन कचऱ्याचा उठाव

कोल्हापूर : कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या माध्यमातून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात साफसफाई करण्यात आली. यामध्ये विविध संघटनांनी भाग घेतला होता. दिवसभरात तब्बल दीड हजार टन कचºयाचा उठाव करण्यात आल्याची माहिती केडीएमजीचे संयोजक इंद्रजित नागेशकर यांनी दिली.

देशातील आघाडीची हाउसकीपींगची सेवा देणाऱ्या बीव्हीजी या कंपनीने कोल्हापूर शहरातील पूरग्रस्तांसाठी आठदिवस सातत्याने सेवा दिली. कंपनीचे ८५ कर्मचारी, १५ डॉक्टर, २५ सहायक कर्मचारी अशा एकुण १२५ जणांच्या पथकाने साफसफाई करत तब्बल दीडहजार टन कचरा उचलला, अशी माहिती बीव्हीजी कंपनीचे विकास भोसले, अमोल कदम, उदय देशमुख, विजय गायकवाड यांनी दिली.कोल्हापूर शहरातील काम आटोपून कंपनीच्या पथकाने ग्रामीण भाग आणि सांगली कडे रवाना झाली आहे. केडीएमजीचे संयोजक इंद्रजित नागेशकर, रवीबापू पाटील सडोलीकर, रवी माने, उदय निचिते यांनी त्यांचे आभार मानले.

केडीएमजीच्या माध्यमातूनही आज साफसफाई व कचरा उठाव मोहीम चालवण्यात आली त्याची माहिती केडीएमजीचे संयोजक उदय निचिते यांनी दिली. केडीएमजीच्या सहा पथकांमार्फत शहरातील पाटील वाडा, कुंभार गल्ली, महावीर गार्डन, न्यू पॅलेस, रमण मळा येथे स्वच्छता करण्यात आली. संजय फाऊंडेशनमार्फत निजंर्तुक फवारणी करण्यात आली.

या मोहिमेचे नेतृत्व चेतन चव्हाण, प्रशांत काटे, प्रमोद माजगावकर, विश्वजीत जाधव, आदित्य बेडेकर आदीनी केले. या मोहिमेत नवी मुंबईच्या ६५, किर्लोस्करचे १५, आरएनएसचे १५, कोल्हापूर पोलीस खात्याचे ५0 तसेच महानगरपालिकेच्या सफाई विभागाच्या ५0 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. कोल्हापूर जिल्हा नाभिक संघाच्या ५0 सदस्यांनीही नागाळा पार्कात सेवा दिली आहे.

तत्पर वैद्यकीय सेवा

केडीएमजीमार्फत दिवसभरात १६00 रुग्ण तपासण्यात आले आणि ४८,000 रुपयांची औषधे विनामूल्य वितरित करण्यात आली. वाईल्डर मेमोरिअल चर्च, बापट कॅम्प, गवत मंडई, उत्तरेश्वर, पंचमुखी गणेश मंदिर, शाहुपुरी, आंबवडे, काखे, वारणानगर, सोनतळी, रजपूतवाडी, जिल्हाधिकारी कार्यालयाची मागची बाजू, कणेरी मठ, पेठवडगाव, बाजार भोगाव येथे औषधे देण्यात आली.

पूरग्रस्त भागात साफसफाईचे काम करण्यासाठी नवी मुंबईची एक टीम गेली आठ दिवस सेवा देत होती, पण त्यातील काही सदस्य शुक्रवारी रात्री आजारी पडल्याची माहिती केडीएमजीच्या पवन गवस आणि प्रविण सोलंकी यांना मिळाल्यावर त्यांनी मध्यरात्री डॉक्टर असोसिएशनच्या शीतल पाटील यांच्या सहकार्याने त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. गेली आठ दिवस पूरग्रस्तांसाठी सेवा देणारे डॉ. शीतल हे स्वत:च आजारी पडले होते.

केडीएमजीमार्फत कोवाड येथे पूरग्रस्तांसोबतच पशू तपासणी शिबीराचे दोन ठिकाणी आयोजन केले होते. यासाठी जितो संघटनेमार्फत या शिबिरासाठी लागणारे कॅटलफीड पुरवण्यात आले. केडीएमजीच्या वैद्यकीय सेवेमध्ये कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, जनरल पॅ्रक्टिशनर असोसिएशन, नॅशनल होमिओपॅथिक असोसिएशन आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स अ‍ॅन्ड नर्सिंग होम्स असोसिएशन या संघटना सहभागी झाल्याची माहिती डॉ. शीतल पाटील, डॉ. दीपक पोवार, डॉ. शिवराज देसाई, डॉ. हरीश नांगरे, डॉ. हर्षवर्धन, डॉ संजीव कददू यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईच्या एअरपोर्ट इनलाईन सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या भरत राणे यांनी दोन लाख रुपयांची औषधे केडीएमजीच्या वैद्यकीय पथकाकडे सुपूर्द केली आहेत.

तीनशेहून अधिक घरात गृहोपयोगी वस्तूंची मदत

केडीएमजीकडे विविध दानशूर व्यक्ती व संस्था यांनी गृहोपयोगी वस्तू शिदोरीच्या स्वरुपात दिल्या होत्या, ती मदत उत्तरेश्वर भागातील १00 हून अधिक घरात प्रत्यक्ष पोहोचविण्यात आल्याची माहिती संयोजक उत्तम फराकटे यांनी दिली. अशा प्रकारे तब्बल तीनशेहून अधिक घरात पूर्ण सर्वेक्षण करून मदत पोहोचवण्यात आली आहे.

स्ट्रक्चरल आॅडिटचे काम सुरु

केडीएमजीच्या माध्यमातून असोसिएशन आॅफ स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगही काम करीत असून त्यांच्या मदतीला २५ विद्यार्थी अभियंतेही धावले आहेत. या पथकाने घराघरांची तपासणी सुरु केली असून आज आणि उदयाही हे पथक पूरग्रस्त भागात जावून पाहणी करणार आहे.

 

Web Title: KDMG through Kolhapur collection of 150 thousand tonnes of waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.